२७७७३ गुन्हे तपासाचे आव्हान पोलिसांसमोर तक्रारदार मात्र हवालदिल

19
0
Share:

पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये तपास न झालेल्या गुन्ह्यांचा बॅकलॉग वाढू लागला आहे. २००४ पासून १५ वर्षांमध्ये तब्बल २७७७३ गुन्ह्यांचा उलगडा झालेला नाही.
नवी मुंबई, पनवेल व उरण परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरामधील औद्योगिकीकरण व नागरीकरण वाढत असून, त्याच प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. प्रत्येक वर्षी गुन्ह्यांचा आकडाही वाढत आहे. पोलीस प्रत्येक गुन्ह्याचा तपास करण्याचा प्रयत्न करत असले तरी अनेक किचकट व गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश येत नाही. प्रत्येक वर्षी अशाप्रकारे तपास न झालेल्या गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. २००४ पासून आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल ७१४४२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामधील ४३६६९ गुन्ह्यांचा यशस्वी तपास करण्यात आला आहे. २७७७३ प्रकरणामध्ये संशयित आरोपींना पकडण्यातही यश आलेले नाही. यामध्ये अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. काँगे्रसचे नगरसेवक आनंद काळे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विश्वास पाटील, वाशीमधील डेंटिस्ट, घणसोलीमधील एटीएममधील सुरक्षारक्षकाची हत्या याप्रमाणे तब्बल १५१ खुनाच्या गुन्ह्यांचा तपास होऊ शकलेला नाही.
अनेक गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांच्या कार्यक्षमतेपुढे प्रश्नचिन्हही निर्माण होत असते. १५ वर्षांमध्येही असे अनेक महत्त्वाचे गुन्हे घडले. यामध्ये ऐरोलीमधील नगरसेवक आनंद काळे यांच्या हत्येच्या गुन्ह्याचाही समावेश होतो. २००८ मध्ये काळे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दहा वर्षांनंतरही अद्याप या खुनाचा उलगडा करण्यात यश आलेले नाही. ऐरोलीमधील राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी विश्वास पाटील यांच्या हत्येचा तपासही लागू शकलेला नाही. अशाप्रकारे तब्बल १५१ खुनाच्या गुन्ह्यांचा तपास लागू शकलेला नाही.
विद्यमान पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी जास्तीत जास्त गुन्ह्यांचा उलगडा व्हावा व तपास झालेल्या गुन्ह्यांमधील संशयितांना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करून नागरिकांना मुद्देमाल परत देण्यासाठीही प्रयत्न केले आहेत.
काही दिवसांपूर्वी १९१ गुन्ह्यांमधील जवळपास ४ कोटी रुपयांचा ऐवज नागरिकांना परत केला आहे. परंतु अशाप्रकारे मुद्देमाल परत देण्याचे प्रमाण एकूण चोरी जाणाºया ऐवजाच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी आहे.

Share: