कांदा व लसूण व्यवस्थापन सल्ला

46
0
Share:

रांगडा कांद्याची काढणी झालेली असून, रब्बी कांद्याची आणि बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्याची रोपे शेतात उभी आहेत. अनेक ठिकाणी लसूण काढणीला आला असेल. अशा परिस्थितीत पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करावे.

रब्बी कांदा

फवारणीद्वारे सूक्ष्म द्रव्ये ५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर ६० आणि ७५ दिवसांनी द्यावी.
फुलकिडे आणि करपा रोगांच्या नियंत्रणाकरिता, फवारणी प्रतिलिटर पाणी
कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम.
लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी गंधक २ ग्रॅम किंवा डायकोफॉल २ मि.लि.
बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या कांदा काढणीच्या २० दिवसांआधी बंद कराव्यात.
पिकाला गरजेनुसार वेळच्या वेळी पाणी देत राहावे.
डेंगळे आलेले कांदे आढळल्यास ते त्वरित काढून टाकावे.
कांदा बीजोत्पादन

फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारू नये, अन्यथा त्यामुळे मधमाश्यांना हानी पोचते.
आवश्यकता असल्यास हाताने खुरपणी करावी. खुरपणी करताना फुलदांड्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
मधमाश्यांची संख्या कमी झाल्याचे आढळल्यास एकरी मधमाश्यांच्या १-२ पेट्या शेतामध्ये कांद्याची फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात.
पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १० ते १२ दिवस ठेवावे.
बियांचे गोंडे काढणीला आल्यानंतर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यांमध्ये ५० टक्के बी काळपट दिसू लागल्यास गोंडे काढायला सुरवात करावी.
सर्व गोंडे एकदम तयार होत नाहीत. जसजसे तयार होतील, तसतसे काढून घ्यावेत. साधारणपणे ३-४ वेळा गोंड्यांची काढणी हाताने करावी लागते. गोंडे ओढून न काढता खुडून काढावेत.
गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरून ५-६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावे. चांगल्याप्रकारे सुकलेल्या गोंड्यांतून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणनी करून बी स्वच्छ करावेत. हलके, फुटलेले आणि पोचट बी वेगळे करून उत्तम प्रतीचे बियाणे एकत्र करावे.
मळणी केलेले बी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. बियाणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.
लसूण पिकाची काढणी आणि साठवण

लसूण काढण्याच्या २० दिवसांपूर्वी कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांच्या फवारण्या थांबवाव्यात.
जवळ-जवळ ५० टक्के पाने सुकल्यानंतर लसणाची काढणी करावी.
लसणाची काढणी गड्ड्यांसहित करावी.
लसूण गड्ड्यांसहित २-३ दिवस शेतात सुकू द्यावा. असे केल्यामुळे लसणाची साठवण क्षमता वाढते.
लसूण लहान कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा. फुटलेले गड्डे वेगळे करावे. तसेच लहान गड्डे प्रतवारी करून वेगळे काढावे.
काढलेल्या लसणाची पाने ओली असताना २० ते २५ सारख्या आकाराच्या गड्ड्यांची जुडी बांधावी आणि पानांची वेणी बांधून घ्यावी.
त्यानंतर अशा जुड्या झाडाखाली किंवा बाजू उघड्या असलेल्या छपरीत १५ दिवस सुकवाव्यात. नंतर जुड्या साठवणगृहात ठेवाव्यात.

Share: