केळी उत्पादनात भारत जगात अव्वल

20
0
Share:

केळी उत्पादनात भारत या हंगामात जगात पहिला ठरणार आहे. सुमारे ३० दशलक्ष टन उत्पादन साध्य होईल, अशी स्थिती आहे. तर जगातला क्रमांक तीनचा निर्यातदार असलेल्या फिलिपिन्समध्ये उत्पादन सुमारे २५ टक्‍क्‍यांनी घटण्याचा अंदाज असून, यामुळे देशातील केळी निर्यातीला चालना मिळत आहे.

देशात केळी उत्पादनासह लागवडीत राज्याची कामगिरीही चांगली राहिली आहे. सध्या केळी काढणीचा हंगाम आंध्र प्रदेशात संपला आहे. तर मध्य प्रदेश व गुजरातमधील काढणी मे महिन्यात सुरू होईल. सध्या राज्यात केळीची काढणी जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक सुरू आहे. इतर भागात निर्यातक्षम केळी उपलब्ध नसल्याने निर्यातदार संस्था, कंपन्या जळगावात दाखल झाल्या आहेत. परिणामी केळीच्या दरात सुधारणा होऊन मागील तीन दिवसांत दर क्विंटलमागे ६० रुपयांनी वधारले आहेत. निर्यातीच्या केळीला १००० रुपयांवर दर क्विंटलमागे मिळत आहेत.

राज्यात निर्यातक्षम केळी रावेर, यावल व मुक्ताईनगर (जि. जळगाव) आणि शहादा (जि. नंदुरबार) येथे सध्या उपलब्ध होत आहे. खानदेशातून प्रतिदिन दोन कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) केळीची निर्यात होत आहे. बहरीन, मस्कट, अबुधाबी, इराण, सौदी अरेबिया आदी आखाती राष्ट्रांमधून रोज सहा कंटेनर केळीची मागणी आहे. परंतु एवढी केळी त्यांना उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

मागील महिन्यापर्यंत आंध्र प्रदेशातील कर्नूल, अनंतपूर व कडप्पा या जिल्ह्यांमधून केळीची निर्यात सुरू होती. या भागात १५ हजार हेक्‍टरवर निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले जाते. पण या भागातील केळीची काढणी संपली आहे. त्यातच जळगाव व इतर जिल्ह्यांमध्ये थंडीच्या विपरित परिणामामुळे हवी तशी केळी निर्यातीसाठी उपलब्ध होत नव्हती. परंतु जशी उष्णता वाढली, तशी मागील पंधरवड्यापासून निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे. आंध्र प्रदेश व इतर राज्यांमध्ये केळी नसल्याने जळगावकडे केळी आयातीसंबंधी विविध संस्थांनी धाव घ्यायला सुरवात केली आहे.

देशात ३० दशलक्ष टन उत्पादन
जगात केळीच्या उत्पादनात भारत अव्वल असून, ३० दशलक्ष टन केळीचे उत्पादन होणार आहे. तर फिलिपिन्समध्ये सात दशलक्ष टन केळी उपलब्ध होते. तेथे या उत्पादनात २५ टक्के घट होईल. तेथील केळीची काढणी जून ते ऑक्‍टोबरमध्ये सुरू होते. तेथून आखाती देशांमध्ये केळीची मोठी निर्यात होते. पण सध्या तेथेही केळी नसल्याने केळीच्या आयातीसाठी भारताकडे आखाती मंडळी वळली असून, विविध संस्थांच्या, एजंटच्या माध्यमातून आखातात केळीची देशातून निर्यात सुरू आहे.

महाराष्ट्रातील उत्पादनातही घट शक्‍य

केळीच्या लागवडीत तामिळनाडू आघाडीवर असून, तेथे एक लाख हेक्‍टरवर लागवड झाली. त्यापाठोपाठ राज्यात ९२ हजार हेक्‍टरवर केळी लागवड झाली होती. गुजरातमध्ये सुमारे ७४ हजार हेक्‍टरवर केळी लागवड झाली होती. तर आंध्र प्रदेशातही सुमारे ७८ हजार हेक्‍टरवर केळीची लागवड झाली होती. देशातील केळीचे उत्पादन दुष्काळी स्थिती किंवा पाण्याच्या समस्येमुळे घटेल. राज्यात जळगाव जिल्ह्यातील यावल भागात दुष्काळी स्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना केळी बागा सोडून द्याव्या लागल्या आहेत. सोलापुरात उजनी भाग वगळता इतर भागातही पाणीटंचाई केळीच्या शिवारात वाढली आहे. तर नंदुरबारात पाचोराबारी (ता. नंदुरबार) व शहादा तालुक्‍यातील सातपुडा पर्वतालगत पाणीटंचाईने केळी पिकाला फटका बसू शकतो. राज्यात सुमारे १० टक्‍क्‍यांनी केळीचे उत्पादन घटेल. परिणामी देशातही उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे.

Share: