नगर जिल्हा परिषदेस आठ कोटींचा निधी

22
0
Share:

जिल्हा परिषदेस मूलभूत सुविधांच्या कामासाठी राज्य सरकारने आठ कोटी सहा लाख ४८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यात १२८ विकासकामे करण्यात येणार आहेत. सर्वाधिक निधी पाथर्डी तालुक्याला मिळाला आहे. जिल्ह्यामधील ७९ ग्रामपंचायतीला हा निधी मिळाला आहे.

शासनाने हा निधी जिल्हा परिषदांना वितरित करण्यासाठी सरकारने एलआरएस (लायबिलिटी रजिस्टर सिस्‍टिम) प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कामासाठी हा निधी मंजूर केला आहे, तो त्याच कामावर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. काही कारणास्तव यातील काही कामे सुरू करणे शक्‍य नसल्यास, अशा कामांची यादी महिन्याच्या आत सरकारला सादर करावयाची आहे.

या कामाची सर्व प्रक्रिया सक्षम अधिकाऱ्यांकडून करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ही कामे हाती घेण्यापूर्वी संबंधित भागात कोणत्याही निवडणुकीची आचारसंहिता लागू नसल्याची खात्री करणे आवश्‍यक आहे. हा निधी ३१ मार्च २०२० पर्यंत खर्च करावयाचा आहे.

सामाजिक सभागृहे, सिमेंट रस्ते, हायमास्ट, स्मशानभूमी सुशोभीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्रवासी निवारा, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंती, सभामंडप, बंदिस्त गटारे आदी १२८ कामांचा यांमध्ये समावेश आहे

Share: