आचारसंहितेपूर्वी आदेश मिळालेल्या कामांना मनाई

7
0
Share:

यापूर्वीच्या निवडणुकांदरम्यान कामांचे आदेश मिळालेली कामे सुरू केली जात होती. मात्र या वेळी निवडणूक आयोगाने त्यात सुधारणा केली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे आदेश दिले असले, तरीही ते काम अाता करता येणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर असे काम करता येऊ शकेल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पापळकर बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी विकासकामांचे उदघाटन, भूमिपूजनाची लगबग सुरू झाल्याचे जनतेला दिसत होते. ही पळापळ आचारसंहिता लागण्यापूर्वी काम मार्गी लावण्यासाठी सुरू होती. परंतु या वेळी आचारसंहितेत विकासकामांबाबत कठोर नियम करण्यात अाला. आचारसंहितेपूर्वी कामांचे आदेश मिळवणाऱ्यांना निवडणुकीच्या काळात ते काम सुरू करता येणार नाही. जे काम प्रत्यक्षात सुरू होते, त्यालाच पूर्ण करण्याची परवानगी मिळू शकते.

निवडणुकीत ३० समित्या

लोकसभा निवडणूक व्‍यवस्थित पार पाडण्‍यासाठी ३० विविध समित्‍या स्‍थापन करण्‍यात आल्‍या आहेत. प्रत्‍येक समितीसाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली आहे. गैरप्रकारावर आळा घालण्‍यासाठी ‘C Vigil‘ अॅप्लिकेशन तयार केले आहे. त्याद्वारे नागरिकांना अनुचित प्रकाराविषयी ध्वनिचित्रफित, छायाचित्र अपलोड करून तक्रार नोंदविता येईल. त्यावर ९० मिनिटात कार्यवाही करण्‍यात येईल. १७५१ मतदान केंद्रांवर ७००४ मतदान केंद्राधिकारी, मतदान अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करावी लागणार आहे.

जिल्ह्यात १८ लाख ५७ हजार मतदार

जिल्ह्यात १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार आहेत. यात पुरुष ९ लाख ६२ हजार ५७६, तर महिला ८ लाख ९२ हजार १५९ आहेत. ४४ मतदार हे तृतीयपंथी आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात वाशीम जिल्ह्यातील रिसोड हा विधानसभा मतदार संघ येतो. त्यामुळे मतदानात वाढ झाली आहे.

Share: