अजित पवार पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल,अजित पवारांच्या गटाला 12 मंत्रिपद आणि 15 महामंडळ भाजप देण्याच्या तयारी

6
0
Share:
मुंबई : राज्याच्या राजकारणात काल 23 नोव्हेंबर रातोरात भूकंप  झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. दिवसभरातील घडामोडींनतर अजित पवार पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहे. यानंतर गेल्या 25 मिनिटांपासून मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यात खलबंत सुरु आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार वर्षा बंगल्यावर मंत्रिपदाच्या वाटाघाटीसाठी आल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सध्या वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. भाजप नेते विनोद तावडे, भुपेदर यादव आणि गिरीश महाजन या बैठकीत उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांसोबत 27 आमदार आहेत. अजित पवारांच्या गटाला 12 मंत्रिपद आणि 15 महामंडळ भाजप देण्याच्या तयारी दर्शवली आहे.

अजित पवार जवळपास 10 वाजता मुंबईतील घरातून बाहेर पडले. यानंतर जवळपास 20 मिनिटानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

अजित पवार यांनी10 मिनिटात तब्बल 16 ट्विट

काही तासांपूर्वीच अजित पवार ट्विटरवर सक्रीय झाले होते. अजित पवार यांनी ट्विटरवर सक्रीय झाल्यापासून 10 मिनिटात तब्बल 16 ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये अजित पवारांनी भाजप सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे आभार मानले  होते. त्यांच्या या ट्विटद्वारे अजित पवारांनी  ‘घरवापसी’ न करण्याचे संकेत दिले होते.

मात्र त्यानंतर काही मिनिटांत त्यांनी मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायमच राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ट्वीट केलं होतं. आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल. ही आघाडी राज्य आणि लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, अशी हमी अजित पवारांनी ट्विटद्वारे दिली.

‘काळजी करण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे. मात्र थोडा संयम आवश्यक आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल तुमचे आभार’ असंही अजित पवार म्हणाले होते.

दरम्यान राष्ट्रवादीकडून वारंवार अजित पवारांचे मन वळवण्याचे प्रयत्न होत आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले. परंतु अजित पवार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे दोन्ही नेत्यांना रिकाम्या हाती परतावं लागलं.

तर दुसरीकडे  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आमदारांची फोडाफोड होऊ नये, यासाठी आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे. तसेच प्रत्येक आमदारांना हॉटेलमधून बाहेर न पडण्याचे आदेशही दिले आहेत, असं सांगितले जात आहे.

 

Share: