Apmc News: पूरग्रस्त व्यापाऱ्यांचा जीएसटी माफ करा ,खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

22
0
Share:

*पूरग्रस्त व्यापाऱ्यांचा जीएसटी माफ करा*
*खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी*

कोल्हापूर, संगलीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा जीएसटी रद्द करावा, अशी लेखी मागणी दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील पूरग्रस्त बांधवांचे कोसळलेले संसार उभारण्यासाठी समाजातील सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सेनाभवन येथे मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच हजारो शिवसैनिक प्रत्यक्ष पुराच्या ठिकाणी जाऊन मदत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्याना एक पत्र लिहून पूरग्रस्त व्यापाऱ्यांची मदत करण्याची मागणी केली आहे.

‘महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, कराड, कोकण, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, नाशिक, वसई, विरार आणि पालघर याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे हजारो घरे, दुकाने, कार्यालये, गोदामे आणि कारखाने यांचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या हजारो दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले. पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी या दुकानदार आणि व्यापाऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे.’ अशा शब्दांत खासदार शेवाळे यांनी राज्यातील गंभीर परिस्थिती केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर मांडली आहे.

‘पुरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अतोनात मेहनत करत आहे. त्याचबरोबर, या पुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना जीएसटी माफ करावा’ अशी लेखी मागणी खासदार शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्याना केली आहे.

*कोट-*
केंद्र आणि राज्य सरकार पूरग्रस्त बांधवांसाठी मदत करत आहे. याशिवाय सामाजिक संस्था, शिवसेना मदत निधी,खासगी अनुदान अशा विविध माध्यमातून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याचवेळी पूरग्रस्त व्यापाऱ्यांनाही सरकारी मदतीची गरज आहे. त्यांना जीएसटी माफ केल्यास मोठा दिलासा मिळू शकेल.

खासदार राहुल शेवाळे यांची पूरग्रस्तांना 25 लाखाची मदत*

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या खासदार निधीतून 25 लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली आहे. या संदर्भात खासदार शेवाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहून विनंती केली आहे.तसेच गेल्या आठवड्यात हजारो बिस्कीटचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्याही खासदर शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या माध्यमातून पूरग्रस्त भागात वितरित करण्यात आल्या.

पत्र हॉट लाईन वर

Share: