Apne News:गणेश नाईकांवर अनेक दिवसांपासून डोळा होता, अखेर योग आला : मुख्यमंत्र

21
0
Share:

नवी मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी अखेर 48 नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला. नवी मुंबई आणि पालघरचे प्रश्न गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोडवले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे या भागातील भाजपचा चेहरा गणेश नाईक  असणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवाय पनवेल महापालिका भाजपच्याच ताब्यात आहे, आता नवी मुंबई महापालिकाही भाजपच्याच ताब्यात येईल, त्यानंतर नवी मुंबईचा वेगाने विकास होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून गणेश नाईकांचं स्वागत

कर्तृत्ववान क्षमतेचं नेतृत्त्व गणेश नाईक यांच्यावर आमचा अनेक दिवसांपासून डोळा होता, असं मिश्कील वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. भाजप हा परिवार असून आम्ही परिवाराचा विस्तार करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाची प्रगती होत असल्याचा विश्वास प्राप्त झाल्यामुळे नेते भाजपात येत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

नवी मुंबई महापालिकेत चांगलं काम केलं आहे, त्याला आता राज्य सरकारचं इंजिन जोडलं जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्राचं चित्र बदललं जाईल. मेट्रोपॉलिटियन क्षेत्रात कुठेही एक तासात जाता आलं पाहिजे हे आमचं स्वप्न आहे. नवी मुंबईतून कुठेही एक तासात जाता येईल, असं जाळं तयार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नाईक साहेब आपण आला आहात, आता आपल्या नेतृत्वात भूमीपुत्रांचे प्रश्न सोडवू. जे प्रश्न प्रलंबित आहेत, ते मार्गी लावू. नाईक साहेबांच्या येण्यामुळे भाजपला पाठबळ मिळालं आहे. मुंबई, पालघर, ठाणे या भागात नाईक साहेबांना मानणारा वर्ग आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

गणेश नाईकांकडूनही मोदी सरकारचं कौतुक

लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारवर घणाघाती टीका करणाऱ्या गणेश नाईकांनी यावेळी मोदी सरकारचं कौतुक केलं. देश प्रगती करत असून ही प्रगती सुसाट वेगाने होत आहे. देशाला अनेक पंतप्रधान लाभले, पण देशाच्या बाहेरही शक्तीमान होण्यासाठी मोदींसारख्या नेत्याची गरज होती, असंही गणेश नाईक म्हणाले.

समान नागरी कायदा देशाची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम हटवले, धाडसाने निर्णय घेतला, असं म्हणत त्यांनी अमित शाहांच्या कामाचंही कौतुक केलं.

“15 वर्षात मला प्रश्न सोडवता न आल्याची खंत”

गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्र्यांनी सर्व वंचित घटकांना सामाजिक, आर्थिक न्याय दिला. शैक्षणिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्रात मंदी अली असताना मुख्यमंत्र्यांनी चांगलं राज्य चालवलं. ज्या नवी मुंबईत मी जन्मलो, वाढलो, मला यश नवी मुंबतील नागरिकांनी दिलं म्हणून प्रगती झाली. मी 15 वर्ष मंत्री होतो, पण माझी खंत आहे, त्यात मी लोकांना न्याय देऊ शकलो नाही, असंही गणेश नाईक म्हणाले.

दरम्यान, गणेश नाईक यांच्या एकेकाळच्या कट्टर विरोधक भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सुद्धा भाजपची ताकद वाढणार असल्याचं सांगितलं आणि गणेश नाईकांचं पक्षात स्वागत केलं.

Share: