राज्यातील सर्व राजकीय व शासकीय कार्यक्रमांवर बंदी:राजेश टोपे

5
0
Share:

मुंबई:राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनावरील राज्यव्यापी बैठक घेत आढावा घेतला (Ban on public program in Maharashtra). यात महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. पुढील काही काळ राज्यात कोणतीही राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम किंवा इतर स्वरुपाचा सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः याबाबत पत्रकारांना माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, “चीनमधील वुहानमध्ये आता रुग्ण वाढत नाही, कारण त्यांनी वुहानमधील सार्वजनिकपणे एकत्र येण्यावर निर्बंध लावले आहेत. लोकांना विलगीकरण करुन ठेवण्यात आलं आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. म्हणूनच आम्ही देखील महाराष्ट्रात सार्वजनिक कार्यक्रम रोखण्याचे आदेश दिले आहेत. कोणताही राजकीय कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम न घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शाळांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तर त्यावरही लक्ष आहे. आवश्यकता पडल्यास शाळांनाही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.”

महाराष्ट्रातील प्रमुख 3 विमानतळांवर 7 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर आपलं विशेष लक्ष आहे. त्यांना 14 दिवसांसाठी वेगळं ठेवलं जात आहे. त्यानंतरच त्यांना आपल्या देशात फिरण्याची परवानगी देण्यावर निर्णय घेतला जात आहे. यात चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये कोरोनाचा मोठा प्रभाव आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही राजेश टोपेंनी सांगितलं.

जे कोरोनासंसर्गित रुग्ण आहेत त्यांच्याबाबत दोन पद्धतीने काम केलं जात आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांवरील कोरोनाचा अधिकचा धोका लक्षात घेऊन त्यांना वेगळं करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच नियमित न भेटणाऱ्या लोकांचाही माग काढून त्यांच्यावरही लक्ष ठेवलं जात आहे, असंही टोपे यांनी नमूद केलं.

“कोरोना नियंत्रणासाठी विविध विभागांची समन्वय समिती”

राजेश टोपे म्हणाले, “कोरोना नियंत्रणासाठी अनेक विभाग एकत्र येऊन काम करत आहेत. प्रामुख्याने नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, गृह विभाग, महसूल विभाग, पर्यटन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांचा यात समावेश आहे. या सर्व विभागांचा व्यवस्थित समन्वय व्हावा म्हणून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक मार्गदर्शक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचा शासन आदेशही लवकरच काढण्यात येईल. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा तोकडी पडू शकते. तसं होऊ नये म्हणून या सर्व विभागांची भूमिका महत्त्वाची असेल.”

महाराष्ट्रात एकूण 9 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची व्याप्ती वाढली आहे. महाराष्ट्रातून जो एक गट दुबईला गेला होता, त्यातील 9 लोक तेथून कोरोनाने संसर्गित होऊन आले आहेत. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत कोरोना पोहचला आहे. यात रायगड, अहमदनगर, पुणे, नाशिक, मुंबई, यवतमाळ आणि नागपूर यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सराकारने काही निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारही करत आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

Share: