भाजपा महिला आघाडी तयार करणार 25 लाख मास्क

22
0
Share:

*भाजपा महिला आघाडी तयार करणार 25 लाख मास्क*

*देवेंद्र फडणवीस यांचा महिला मोर्चा, महिला लोकप्रतिनिधींशी संवाद सेतू*

*रेशन धान्य, आरोग्य सुविधा, तब्लिकबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विनंती *

मुंबई:माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, महिला खासदार-आमदार, जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ऑडियो ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधला. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 25 लाख मास्कची घरोघरी निर्मिती करून त्यांचे गरजूंना वाटप करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
या संवादसेतुमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, पंकजाताई मुंडे, विजयाताई रहाटकर, माधवीताई नाईक आणि अन्य नेते सहभागी झाले होते. बहुतेक महिला पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याबद्दल आपल्या तक्रारी मांडल्या. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपण राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे तसेच आज मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले असल्याचे सुद्धा सांगितले. केंद्र सरकारचे आरोग्य ॲप वापरण्यासंबंधी सुद्धा अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी सूचना केल्या.

*देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र*

विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून काही विनंती केली आहे. या पत्रात ते म्हणतात की, संपूर्ण देशात तसेच राज्यात आपण सारे कोरोनाविरोधातील लढा लढतोय. हा लढा येणाऱ्या काळात अधिकाधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे अधिक नियोजनातून आपल्याला मार्गक्रमण करावे लागणार आहे. राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. दररोज मी राज्यातील विविध घटकांशी संवाद साधत असून, त्यातून प्रामुख्याने तक्रारी रेशन धान्यासंदर्भात आहेत. वस्तुतः केंद्र सरकारने ३ महिन्यांचे धान्य रेशनमार्फत मोफत देण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना आणि त्यापैकी ९० टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला असताना सुद्धा त्याच्या वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे. त्यामुळे यात आपण स्वतः लक्ष घालावे, अशी माझी नम्र विनंती आहे. सुमारे १६ राज्यांनी रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनासुद्धा धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात सुद्धा असा निर्णय घेणे सहज शक्य आहे. अतिरिक्त लागणारे धान्य केंद्र सरकार अत्यल्प दरात उपलब्ध करून देत असले तरी वाटपातील साठा शिल्लक राहत असल्याने त्याची गरज पडणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोटा उपलब्ध दिल्याप्रमाणे प्रत्येकाला ३ महिन्यांचे धान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, त्याचे आधारकार्ड प्रमाण मानून त्यांना धान्य उपलब्ध करून द्यावे तसेच ज्यांच्याकडे दोन्ही नाही अशांची यादी तयार करून ती यादी प्रमाणित करून त्यांनाही धान्य सहज उपलब्ध करून देता येईल.
मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि एकूणच लॉकडाऊनच्या काळातील परिस्थिती याचेही गांभीर्याने चिंतन होणे गरजेचे आहे. रुग्णालयातील स्थिती आणि प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुरक्षा उपाययोजनांची कमतरता याबाबी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. या बाबतही त्वरित उपाय योजना करण्याची नितांत गरज आहे. मात्र अद्यापही याबाबतचे उचित प्रोटोकॉल्स कार्यान्वित न झाल्याने अग्रीम पंक्तीतील आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स देखील रोगाने ग्रसित होतांना दिसत आहेत. यावर अत्यंत त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहेत.
तब्लिकमधून आलेले अनेक लोक महाराष्ट्रात तसेच इतर राज्यातही गेले आहेत. दिल्लीतील कार्यक्रमातील उपस्थित असलेले नागरिक तसेच त्यांच्या संपर्कांत आलेले अन्य संशयित यांच्या संदर्भातही कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारचा धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई आपण करावी. आज भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या यादीत ही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच अत्यंत कडक कारवाई या संदर्भात अपेक्षित आहे.
महाराष्ट्र व मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मी काही मुद्यांवर आपणाशी दूरध्वनीद्वारे देखील चर्चा केली आहे व इतर मुद्यांसंदर्भात मी आपणास सविस्तर पत्र पाठविणारच आहे. आपण घेत असलेल्या सर्व निर्णयांना भाजपा म्हणून आमचा पाठिंबा आणि सहकार्य आहेच. मात्र या महत्वाच्या बाबतीत हस्तक्षेप करून जनहिताच्या दृष्टीने आपण त्वरेने निर्णय घ्याल अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Share: