Cidco police housing scheme : सिडकोचा अजब गाजब कारभार ,पोलिसांसाठी तयार घरे हि 3 लाखाने महाग!

30
0
Share:

नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सिडकोने जुलै २०२० मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे. सिडकोने स्वस्त घरात पोलिसांना घरे दिल्याचे भासवले असले तरी वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये सर्वसामान्यांसाठी काढलेली सोडत १४५०० घरांसाठी होती. तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेतील अनेक घरे रद्द झाली होती. प्रथम दर्शनी हि रद्द झालेली घरेच किंमत वाढवून पोलीस योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच बहुतांश घरांचे बांधकाम पूर्ण झालेले असताना पोलिसांना हि घरे पावणे दोन लाख ते तीन लाखाने महाग का विकत आहेत असा प्रश्न पोलीस बांधवांना पडला आहे.

२०१८ मधील सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटातील तळोजा, सेक्टर -२७ मधील २९.८२ चौ मी घराची किंमत २५ लाख ४० हजार ९०० रुपये होती, ती वाढवून २८ लाख ४४ हजार २०० रुपये केली. हि रक्कम साधारणपणे ३ लाख ३ हजार ३०० रुपयाने वाढवली आहे. २०१८ मधील सोडती मध्ये घणसोलीतील ३२० चौरस फूट घराची किंमत २५ लाख ३८ हजार ९०० रुपये होती. सध्या पोलिसांसाठी काढलेल्या योजनेतील अशाच घराची किंमत २७ लाख ९२ हजार ८०० रुपये आहे. २०१८ मधील सोडती मध्ये खारघर मधील ३२० चौरस फूट घराची किंमत २६ लाख ३५ हजार २०० रुपये होती. ती किंमत पोलिसांच्या योजनेमध्ये २८ लाख ९८ हजार ७०० रुपये आहे.

वरील तीन प्राथमिक उदाहरणावरून असे दिसते कि एकाच वेळी बांधलेल्या घरांची किंमत पोलिसांसाठी साधारण २.५० लाख ते ३ लाख रुपयांनी जास्त आहे. पोलिसांकडून जास्त रक्कम घेणे हा पोलिसांचा सन्मान कसा होऊ शकेल ? अशीच दरवाढ पोलिसांसाठी असलेल्या योजनेतील इतर घरांबाबत हि आहे. या अतिरिक्त किमतीमुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनसेकडे नाराजी व्यक्त केली. तसेच हा पोलिसांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त केली.

मनसेने या प्रश्नावर आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केली. सिडकोने ६५ हजार घरांची सोडत २०२० मध्ये काढणार असल्याचे जाहीर केले. तसेच सिडकोने या घरांची किंमत बाजारभावापेक्षा साधारण १० लाखाने कमी असणार असे जाहीर केले. मग पोलिसांकडून अतिरिक्त शुल्क का आकारले जाते ? याच धर्तीवर सिडकोने पोलिसांसाठी काढलेल्या घरांसाठी अतिरिक्त सवलत जाहीर करावी अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली. तसेच सिडकोने पोलिसांसाठी काढलेल्या घरांची किंमत २०१८ मधील सोडती एवढी किंवा त्याहून कमी करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत मनसेने केली.

या पत्रकार परिषदेत मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष अप्पासाहेब कौठुळे , शारीरिक सेना शहर संघटक सागर नाईकरे , मनविसे उप शहर अध्यक्ष संदेश डोंगरे हे उपस्थित होते.

Share: