राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला निफाड ८ अशांवर

24
0
Share:

गुरुवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील ८.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या दोन दिवसांत उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह कमी होऊन पुन्हा तापमान वाढून उन्हाच्या झळा काही प्रमाणात वाढतील, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात जवळपास चाळीस अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा गेला होता. त्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच तीव्र होऊ लागल्या होत्या. मात्र, दोन दिवसापासून थंड वाऱ्यामुळे रात्रीच्या तापमानाबरोबर दिवसाच्या कमाल तापमानातही चांगलीच घट झाली आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

विदर्भातील चंद्रपूर येथे बुधवारी सायंकाळपर्यंत ३६.२ अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमान नोंदविले गेले. तर गडचिरोली येथे ३६ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यातही कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि कोकणातही कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. हवेतील गारव्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

निफाडपाठोपाठ नगरमध्ये १०.० अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदले गेले. उर्वरित भागातही तापमानात चांगलीच घट झाली आहे. कोकणातही किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस या दरम्यान होते. मराठवाड्यात १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर विदर्भात १४ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. सध्या हिदी महासागराचा परिसर आणि बंगालचा उपसागर या परिसरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे. तसेच छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. शनिवारी आणि रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही अंशी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

Share: