Coronavirus News: परभणी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 वर , यातील बहुतांशी बाधित मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या रेड झोन मधून आलेले आहेत

21
0
Share:

 

परभणी : लॉकडाऊन घोषित केल्यानंतर परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नागरिक परतले  आहेत. शिक्षण, नौकरी रोजगार मिळवण्यासाठी हजारो नागरिक मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद सारख्या महानगरात गेली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे अनेक उद्योग धंदे कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या हातच काम गेलंय, हाताला काम उपलब्ध नसल्याने लाखो मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे इतर जिल्ह्या प्रमाणेच परभणी जिल्ह्यात ही कोरोनाचा धोका वाढला (Corona Patient increase) आहे.

परभणी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 वर जाऊन पोहचला आहे. यातील बहुतांशी बाधित मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या रेड झोन मधून आलेले आहेत. परभणी जिल्ह्यात मागील दोन महिन्यात 54 हजार 183 जणांनी प्रवेश केला आहे. यात सर्वाधिक संख्या मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्यांची आहे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळॆ कोरोनाचा धोका वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम हाती घेण्यात आलीआहे. यासाठी 10 हजार पथकांमार्फत कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेड होण्याचा धोका कमी झाला आहे.

मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथून आतापर्यंत परभणीत अनेकजण आले आहेत. यामध्ये गंगाखेड तालुक्यात 13 हजार 574, जिंतूर तालुक्यात 7 हजार 622, मानवत 2 हजार 140, पालम 3 हजार 50, परभणी 4 हजार 809, पाथरी 9 हजार 18, पूर्णा 4 हजार 571, सेलू 8 हजार 962, सोनपेठ 473 असे एकूण 54 हजार 183 नागरिक लॉकडाऊन नंतर जिल्ह्यात अधिकृत परतले आहेत. अनधिकृत जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्याही यापेक्षा अधिक असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

परभणी जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्यांची संख्या ही फार कमी असून शहर आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या 2 हजार मजुरांना 88 बसच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्यात आणि राज्यात सुखरूप पोहचावण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 80 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील दोघांना आपला जीव गमवावा लागलाय तर केवळ एक जण आतापर्यंत बरा होऊन सुखरूप घरी परतला आहे.

Share: