Coronavirus Outbreak Updates: भारतात कोरोनाग्रस्त तीन लाखांच्या उंबरठ्यावर, दहा हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण, जगात चौथ्या स्थानी

5
0
Share:

*महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चीनमधील रुग्णसंख्येपेक्षा अधिक झाल्याने धाकधूक वाढली आहे.

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारताने अवघ्या चार दिवसात सहाव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी उडी घेतल्याने चिंता वाढली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येने यूके आणि स्पेन या दोन देशांना या कालावधीत मागे टाकले. पहिल्यांदाच देशात एका दिवसात दहा हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडले. (India Corona Patient Update)

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. भारतात एकूण 2 लाख 97 हजार 535 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज सकाळी (शुक्रवार 12 जून) 9 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात भारतात 10 हजार 956 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले. ही देशातील एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे.

गेल्या 24 तासात 396 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्येत 1 लाख 41 हजार 842 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 1 लाख 47 हजार 195 जण कोरोनामुक्त झाले आहेत, ही दिलासादायक बाब. तर आतापर्यंत 8 हजार 498 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

भारतात कोविडने कम्युनिटी ट्रान्समिशनच्या (समूह संसर्ग) टप्प्यात प्रवेश केला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. आतापर्यंत देशातील केवळ 0.73% लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. तर रिकवरी रेट म्हणजे कोरोनामुक्त होण्याचा दर वाढून 49.21% झाला आहे.

दुसरीकडे, एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चीनमधील रुग्णसंख्येपेक्षा अधिक झाल्याने धाकधूक वाढली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत चीन मागे-मागे जाण्याची करामत करत आहे. गेल्या काही दिवसात भारताने यूके, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्की आणि इराण या देशांना मागे टाकले.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारताच्या पुढे असलेल्या (तिसऱ्या स्थानावर) रशियामध्ये 5 लाख 2 हजार 436 रुग्ण आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेली अमेरिका (20 लाख 89 हजार 701), ब्राझील (8 लाख 5 हजार 649) अशी आकडेवारी आहे.

Share: