शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी सरसावले अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी

24
0
Share:

नवी मुंबई: मुंबई, नवी मुंबई, ठाणे यांसारख्या महानगरांना अधिक स्वच्छ आणि अधिक निरोगी बनवायचे असेल, तर त्यासाठी तंत्रज्ञानआधारित नावीन्यपूर्ण कल्पनांशिवाय तरणोपाय नाही, हे ओळखून अभियांत्रिकीच्या २४ महाविद्यालयांमधील २५०हून अधिक विद्यार्थी सरसावले आहेत. मॅस्टेक-मॅजेस्को या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ‘प्रोजेक्ट डीप ब्ल्यू’ या उपक्रमांतर्गत शहरांतील नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी विद्यार्थ्यांनी आपलं तंत्रज्ञानातील कसब आणि कल्पनांची भरारी पणाला लावलं, आणि त्यातूनच काही स्तुत्य उपाययोजना पुढे आल्या आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी तसंच त्यांना नागरी समस्यांची थेट ओळख करून देण्यासाठी मॅस्टेक-मॅजेस्को ‘प्रोजेक्ट डीप ब्ल्यू’ ही विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला आणि सृजनशीलतेला आव्हान देणारी स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचं चौथं वर्ष असून तिची उपांत्यफेरी शनिवारी नवी मुंबईतल्या महापे येथे पार पडली. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, हागणदारीमुक्त शहर, कचरा वेगवेगळा करणे, आणि प्लास्टिकबंदी या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.

Share: