परदेशी कांद्याची आयात बंद,

–उग्र बास व तिखटपणा यामुळे ग्राहकांनी फिरवली पाठ
रेश्मा निवडुंगे-एपीएमसी न्युज
नवी मुंबई: तुर्भे येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत सध्या परदेशातून कांद्याची आयात बंद झाली आहे.यंदा काही दिवसांपूर्वी इजिप्तवरून कांद्याची आवक सुरू झाली होती.हा कांदा तुर्की कांदा म्हणून ओळखला जात आहे.हा कांदा आकाराने मोठा असला तरी उग्र वास व तिखटपणा यामुळे या मालाला ग्राहकांची पसंती मिळत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
गेल्या २-३ महिन्यापासून कांद्याचे दर गगनचुंबी आहेत.त्यामुळे परदेशी कांद्याची आवक बाजारात सुरू झाली होती.हा कांदा आकाराने मोठा असून सफेद व लाल या दोन रंगात बाजारात उपलब्ध आहे.उग्र वास व जास्त तिखटपणा यामुळे गृहिणीबरोबरच हॉटेल चालकांनी देखील या कांद्याकडे पाठ फिरवली आहे.स्वयंपाक बनवताना या कांद्यासाठी तेल ही जास्त लागत असल्याची तक्रार केली जात आहे.सध्या रोज लाल कांदा ५ कंटेनर तर सफेद कांदा २ कंटेनर आवक होत होती. घाऊक दरात लाल कांदा २९ रु प्रति किलो तर सफेद कांदा २१रु प्रति किलो दरात उपलब्ध आहे.किरकोळ बाजारात हा इजिप्त लाल कांदा ५० रु तर सफेद कांद्याला पसंतीच मिळत नाही.
हॉटेल मालक ही एकदा या मालाची खरेदी केल्यावर पुन्हा त्या कांद्याकडे पाठ फिरवत आहे असे,नूर सय्यद या कांद्याच्या व्यापाऱ्याने सांगितले.मालाला उठाव नसल्याने या मालाची आयात बंद करण्यात आली आहे.