माथाडीच्या नावाखाली खंडणी गोळा करणारे गजाआड

32
0
Share:

*माथाडीच्या नावाखाली खडणी गोळा करणारे गजाआड…पीडित उद्योजकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांचे आवाहन*

पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधील माथाडीच्या नावाखाली किंवा कंपनी मधील भंगार,लेबर कंत्राटासाठी कंपनी चालकाना धमकावून खंडणी गोळा केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर आज चाकण मधील म्हाळुंगे येथील एका कंपनी मध्ये माथाडी संघटनेचे नावाखाली खंडणी घेताना पाच जणांच्या टोळीला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे.
अजय कौदरे, प्रदीप सोनावणे , गणेश सोनावणे, स्वप्नील पवार आणि धोंडिबा ऊर्फ हनुमंत वडजे अशी अटक करण्यात आलेलया आरोपींची नावे आहेत.ह्या टोळीला अटक केल्याने चाकण,भोसरी ओद्यगिक वसाहती मधील माथाडी वर्तुळात खळबळ उडाली आहे

या आरोपींनी 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरच्या दरम्यान म्हाळुंगे येथील एका कंपनीमध्ये येऊन उद्योजकाला धमकी दिली की, कंपनी चालवायची असेल तर वेदांत एटरप्रायझेस नावाच्या कंपनीच्या एका प्रतिनिधीला कामावर घ्या, तो कामावर येणार नाही मात्र त्याचा पगार व इतर देणी असे मिळून दरमहा 20 हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुमची विकेट काढेल, अशी धमकी दिली.याप्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधींनी म्हाळुंगे पोलीस चौकीत तक्रार दिली.या तक्रारीची तत्काळ दखल घेत म्हाळुंगे पोलिसांनी सापळा रचून 20 हजारांची खंडणी घेताना माथाडी संघटनेचा अध्यक्ष अजय कौदरे, प्रदीप सोनावणे आणि गणेश सोनावणे या तिघांना जागेवरच अटक केली. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्वप्नील पवार आणि धोंडिबा वडजे या दोघांनाही अटक केली.चाकण ओद्यगिक पट्ट्यात असे अनेक लघु आणि मध्यम उद्योग कार्यरत असून या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून माथाडी च्या नावाखाली खंडणी उकळण्याच्या अनेक घटना घडत आहेत मात्र भीतीपोटी उद्योजक हे तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्याने या पट्ट्यामध्ये खंडणीखोरांचा सुळसुळाट झाला आहे.ओद्यगिक वसाहतीत अनेक खंडणी बहाद्दर कार्यरत असून कुठल्याही टोळीकडून आणखी कोणाला धमकावून खंडणी घेत असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी निर्धास्तपणे पुढे यावे, असे आवाहन पोलीस उपायुक्‍त मंचक इप्पर यांनी केले आहे.

Share: