दुष्काळी उपाययोजनांमध्ये सरकार अपयशीः विरोधकांची टीका

23
0
Share:

या अधिवेशनात दुष्काळावर चर्चा होणे अपेक्षित होते. दुष्काळी उपाययोजना, शेतकरी कर्जमाफी, पीकविम्याचे अनुदान, केंद्राची मदत, जलयुक्त शिवार, टँकरने पाणीपुरवठा असे अनेक मुद्दे चर्चेला घ्यायचे होते, परंतु ते येऊ शकले नाहीत. त्यासंदर्भात आम्ही सरकारसोबत स्वतंत्रपणे लढा देणार आहोत. तसेच दुष्काळी उपाययोजना आणि नोकर भरतीत भाजप-सेनेचे सरकार साफ अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (ता. २८) राज्य सरकारवर सोडले.

भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी विखे पाटील म्हणाले की, राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेत दुष्काळाची भयावहता, त्यासंदर्भात करावयाची उपाययोजना आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकारला आजवर आलेले अपयश यावर आम्ही ऊहापोह करणार होतो. पण अधिवेशन स्थगित झाल्यामुळे ही चर्चा होऊ शकली नाही.

अर्थसंकल्पीय चर्चेतील माझे भाषण मी सभागृहाच्या पटलावर ठेवले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्याच्या घोषणेतील फोलपणा, एनडीआरएफकडून राज्याला आजवर एक दमडीही न मिळणे, राज्य सरकारकडून दिली जाणारी तुटपुंजी मदत, चारा छावण्यांची आवश्यकता, पाण्याची टंचाई, रोजगाराची उपलब्धता नसणे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणे अशा अनेक मुद्यांकडे मी या भाषणातून सरकारचे लक्ष वेधल्याची माहिती विखे पाटील यांनी पत्रकारांना दिली.

Share: