गृहिणींनो.. कोथिंबीर, मेथी खरेदी करताय! वाचा ही खुशखबर..

23
0
Share:

*कोथांबीर भावात घसरण ,कोथिंबीर जुडीला दोन रुपयाचा दर

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये कोथिंबीर आणि मेथी पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे, त्यांच्या भावात घसरण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये प्रति जुडी विकली जाणारी मेथी ५ रुपये, तर कोथिंबिरीची जुडी २ ते ५ रुपयांवर आली आहे.त्यामुळे आपला मालाला हमीभाव मिळत नसल्याने काही शेतकरी प्रतिनिधी यांनी आपल्या माल बाजार आवारात फेकून टाकले आहे .

अवकाळी पावसामुळे शेती पिके खराब झाली होती. फळभाज्यांप्रमाणे पालेभाज्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला. भाजीपाला अधिक नाशवंत असल्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये येण्याआधीच काही माल खराब होत होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मेथी व कोथिंबिरीचे भाव वधारले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजारात मेथी व कोथिंबीर साठवण्याचे साधन नसल्यामुळे आणलेला माल तत्काळ विकला न गेल्यास उघड्यावर खराब होतो. त्यामुळे मालाची आवक कमी होऊन कोथिंबीर व मेथी ३० ते ४० रुपये जुडी भावाने विकले जात होते. मात्र, सध्या थंडीची लाट पसरल्यामुळे भाजीपाला पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने, त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत मेथी व कोथिंबिरीची आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे. वाशीच्या भाजीपाला मार्केटमध्ये पुणे, नगर, नाशिक भागातून मेथी व कोथिंबिरीचा माल दाखल झाला आहे. आवक वाढल्यामुळे मेथीला ५ रुपये, तर कोथिंबिरीला २ ते ५ रुपये प्रति जुडी भाव मिळत आहे.
बाजार समितीत दोन महिन्यांपूर्वी तब्बल ८० रुपये प्रति जुडी असा कोथिंबीरने उच्चांक गाठला होता. आठ दिवसांपासून कोथिंबीरच्या भावात घसरण होत आहे. बाजारभाव मिळाल्याने शेतकयांचा उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक खर्च खिशातून भरण्याची वेळ आली आहे.अशी माहीती शेतकरी प्रतिनिधी राजाराम टोके यांनी दिली आहे

पुणे जिल्ह्यातून आवक वाढली

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यात मेथी व कोथिंबिरीची आवक वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत भाव कोसळले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर व मेथीला तब्बल एक रुपयांपासून चार रुपये प्रति जुडीचा भाव मिळाला. चाकण येथील बाजारातही मोठ्या प्रमाणात मेथीची आवक झाली होती. थंडीच्या मोसमात मेथीचे पिक जोमात आल्यामुळे या बाजारात दोन आठवड्यांपूर्वी २० रुपये प्रति भावाने विकली जाणारी एक जुडी आता १० रुपयांपेक्षा कमी भावाने विकली जात आहे.

Share: