औद्योगिक उत्पादनात १.१ टक्क्याची घसरण; देशात जाणवू लागले आर्थिक मंदीचे परिणाम

17
0
Share:

-औद्योगिक उत्पादनात १.१ टक्क्याची घसरण; देशात जाणवू लागले आर्थिक मंदीचे परिणाम

आर्थिक मंदी आता औद्योगिक उत्पादनातही जाणवू लागली आहे. यंदा आॅगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन १.१ टक्क्याने घटले आहे. वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग), वीजनिर्मिती आणि खाण क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन घटले आहे.
सरकारने शुक्रवारी ही माहिती दिली. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) आॅगस्ट, २०१८ मध्ये ४.८ टक्क्यांनी विस्तारला होता, हे पाहता यंदाच्या आॅगस्टमधील घट मोठीच आहे.
वस्तू उत्पादन क्षेत्राचा आयआयपीमधील वाटा तब्बल ७७ टक्के आहे. नेमक्या याच क्षेत्राच्या उत्पादनात आॅगस्ट, २०१९ मध्ये १.१ टक्क्याची घट झाली आहे. गेल्या वर्षी या क्षेत्रात तब्बल ५.२ टक्के वाढ झाली होती.

वस्तू उत्पादनातील घसरगुंडीमुळे आयआयपी खाली येऊन वृद्धीच्या दृष्टीने नकारात्मक झाला.

– आॅगस्ट २०१९ मध्ये वीज निर्मितीतही ०.९ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात वीज निर्मितीत ७.६ टक्के वाढ झाली होती. खाण क्षेत्र ०.१ टक्क्यांवर स्थिर राहिले.

एप्रिल ते आॅगस्ट या काळात आयआयपीचा वृद्धिदर २.४ टक्के राहिला. मागच्या याच काळात तो ५.३ टक्के होता. देशातील आर्थिक मंदीचा हा परिणाम आहे. वाहन उद्योगासह अनेक उद्योगांना मंदीने ग्रासले आहे.

Share: