समृद्ध होतेय शेती, शिक्षणामुळे होतोय शाश्वत शेतीचा जागर

43
0
Share:

उगम ग्रामीण विकास संस्था हि गत २२ वर्षापासून शाश्वत ग्रामीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्था प्रामुख्याने नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, पत पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, दर्जेदार शिक्षण व क्षमता बांधणी विषयावर काम सुरु आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबाचा शाश्वत विकास करून त्यांना आर्थिक व सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे संस्थेचे धोरण आहे.

उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, प्रकल्प संचालक सुशांत पाईकराव तर प्रकल्प समन्वयक म्हणून विकास कांबळे कार्यरत आहेत. संस्थकडे एकूण ६५ प्रशिक्षित कार्यकर्त्याच्या समावेश आहे.

वातावरणातील बद्दलाआधारित शाश्वत शेती

रासायनिक खते व कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होत आहे. एकेकाळी लाकडी नांगराने नागारली जाणारी जमीन लोखंडी नांगराने नांगरली जाऊ लागली. परंतु रासायनिक पद्धतीमध्ये वाढ झाल्याने जमीन आणखी कणखर झाली आता ती ट्रक्टरने नांगरली जात आहे. तर काही ठिकाणी ट्रक्टरने सुद्धा नांगरणी होत नाही. म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेकडून जमिनीची पोत सुधारले पाहिजे यासाठी ३० गावातील ७५० शेतकऱ्याना माध्यमातून एकत्र आणले व त्यांना सेंद्रिय खते व औषधी तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. शेतकरी शेतीसाठी लागणारे सर्व खते व औषधी स्वतः तयार करतात व नियमित शेतीत वापरतात. सेंद्रिय खते तयार करण्यासाठी मुख्यतः शेतीतील काडीकचपट, शेण, गोमुत्र तसेच शेतीतील इतर संसाधनाचा वापर केला जातो. सेंद्रिय खते व औषधी रासायनिक खते व औषधीच्या तुलनेत १० टक्के रक्कमेत तयार होतात. शेतकरी कमी रक्कमेमध्ये चांगले उत्पन्न घेत आहे. तसेच रासायनिक मालाच्या तुलनेत जास्त भाव सुद्धा मिळत आहे.
सेंद्रिय पध्दतीमुळे मिळणारे धान्य विषमुक्त मिळते. उगम संस्थेकडून जिल्हा परिषद हिंगोलीच्या परिसरात दर शुक्रवारी सेंद्रिय भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरतो. उगमच्या मार्गदर्शनातून निर्माण झालेले विषमुक्त भाजीपाला ह्या बाजारामध्ये विक्रीसाठी २० शेतकरी घेवून येतात. हा उपक्रम आय.आय.आर.डी. संस्थेच्या मार्गदर्शनातून राबविण्यात येत आहे. ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

कयाधू नदी व ओढ्याकाठावरील गवताळ पट्ट्याचे संवर्धन कार्यक्रम

दुष्काळी आणि मागासलेला जिल्हा ही हिंगोली जिल्ह्याची ओळख पुसली जाऊन हा जिल्हा समृद्धीकडे कसा जाईल यासाठीच उगम कटीबद्ध आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल तर पाणी व्यवस्थापन आणि संवर्धन, जैवविविधता संवर्धन यावर भर देणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, नवी दिल्ली, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन केंद्र, पुणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने कयाधू नदी व ओढ्याकाठावरील गवताळ पट्ट्याचे संवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कयाधू नदी काठावर मारवेल, पवना, जोंधळी व कुंदा अशा काही पोषक गवताच्या जाती आहेत.

या गवतांचे प्रकार पशुधनासाठी पोषक आहेतच पण जमिनीची माती आणि कस टिकून ठेवण्यासाठीही पूरक आहेत. गेल्या पाच वर्षापासून उगम या प्रकल्पावर कार्यरत असून लोकांचे संगठन त्यांचे मनपरिवर्तन, जाणीव जागृती या सर्व आघाड्यांवर सध्या काम सुरु आहे. शेतकरी थडीचा वापर शेतीसाठी करायचे त्यासाठी गवत नष्ट केले जायचे. पण आता हळूहळू मानसिकता बदलत आहे. त्यांना थडीचे महत्व पटले आहे. इतर पिके घेऊन जेवढे उत्पन घेतो तेवढेच उत्पन्न गवताच्या जोपासनेतून पशुधनासाठी चारा आणि दुग्ध व्यवसायातून मिळू शकते हे त्यांच्या लक्षात आले आहे.

त्याचप्रमाणे गवतामुळे नदीत वाहून जाणार्या मातीचे प्रमाण कमी होऊन नदीचे पात्र ठराविक राहणार आहे. पूर्वी कुरण क्षेत्र कमी केल्यामुळे नदीच्या काठेवरील बरीच माती वाहून गेल्याने नदी रुंद झाल्याचे निरीक्षण आहेत. हे कमी कुरण क्षेत्र वाढविल्यामुळे नदी मात्र ठराविक ठेवणे शक्य आहे शक्य आहे हे शेतकऱ्यांना समजले आहे. सामगा ते सोडेगाव अशा बारा गावातून सध्या उगम कार्यरत आहे.

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचे व कुरणक्षेत्राचे तुकडे झाले. कुरणक्षेत्र नष्ट करून शेतकरी शेती करीत होते. त्यामुळे स्थानिक व दुर्मिळ जैवविविधता नष्ट होऊ लागली. गवतामुळे टिकून राहीलेली माती नदीच्या पुरामुळे वाहून जाउ लागली. मातीचा एक इंचचा स्थर निर्मान होण्यासाठी १०० ते ३०० वर्ष लागतात आणि एका पावसाळामध्ये सरासरी ४ इंच माती वाहून जाऊ लागली. हि एक गंभीर समस्या निर्माण झाली होती. म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेने बायफ संस्थेच्या मद्द्तीने गवताची पौष्टिकता जाणून घेतली.

हिंगोली जिल्ह्यातील मुख्य पिक म्हणून सर्व शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. म्हणून उगम संस्थेने सोयाबीन पासून मिळणारे उत्पन्न आणि गवतापासून मिळणारे उत्पन्न यांचा तुलनात्मक अभ्यास २० शेतकऱ्याच्या माधमातून पूर्ण केला व शेतकऱ्यांसमोर मांडला आहे. तेव्हा असे लक्षात आले कि, सोयाबीन पिकाच्या दुप्पट उत्पन्न हे मारवेल गवतापासून मिळते. जेव्हा शेतकऱ्यासमोर मांडले तेव्हा शेतकऱ्यांना विश्वास बसत नव्हता.

आता १२ गावातील ५६५ शेतकऱ्याच्या मदतीने ३१७ हेक्टर कुरणक्षेत्र निर्माण केले आहे. १२ गावातील ५ गावामध्ये दुध संकलन केंद्र आहेत. ५० टक्के शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात त्यामुळे त्यांना नियमित पैसा मिळतोय. गवत संवर्धनामुळे शाश्वत उपजीविका मिळाली आणि आता शाश्वत ग्रामीण विकासाकडे त्यांची वाटचाल सुरु झाली आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापणासाठी पाटा वाटप

दरवर्षी शेतकऱ्यांना पाटा वाटप केला जातो. पाट्यामध्ये २२ प्रकारच्या बियाणाचा समावेश असतो. हे सर्व बीज खाद्यपिकाच्या असतात. शेतकरी जे मुख्य पिक घेतात त्याच पिकाच्या मध्ये एक पाटा टाकला जातो. याचा मुख्य उद्देश आहे कि, एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रित करणे. जेव्हा मुख्य पिकावर कीड पडते तेव्हा पाट्यावर मोठ्याप्रमाणावर फुल असतात त्यामुळे मुख्य पिकावरील कीड हि पाट्याकडे आकर्षित होते. त्यामुळे मुख्य पिकाचे नुकसान होत नाही.
पाट्यामध्ये २२ प्रकारचे बियाणे असल्याने प्रत्येक दिवसी ताजा व वेगवेगळा आहार मिळतो. त्यामुळे अन्नातील जैवविविधता वाढते. पाट्यातील अन्नाच्या सेवनामुळे महिलांमधील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे.
पाट्यामुळे शालेय विद्यार्थी शेतात चवळी, शेळणी, काकडी, मका अशी खाद्य पिके खाण्यासाठी जातात त्यामुळे त्यांना शेतीची आवड निर्माण होते. पक्षी, कीड व फुलपाखरे पण पाहण्यास मिळतात.

शिक्षणाबरोबर जपतोय पर्यावरण

शिक्षण शाळेतच मिळते असे नाही किंवा ते पुस्तकात मिळते असे नाही, मात्र शिक्षणाचा केंद्रबिंदू शाळा व पुस्तक होय. पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणेच्या मद्दतीने पर्यावरण आधारित शिक्षण उगम संस्थेकडून २० शाळेमध्ये गत ५ वर्षापासून शिकविल्या जात आहे.

पर्यावरणाचा बिघडणारा समतोल आपण सारे अनुभवतो आहोत. पर्यावरणाविषयी लहानपणी योग्य मार्गदर्शन मिळाले तर येत्या काळात आपल्याला काही सकारात्मक चित्र दिसण्याची शक्यता आहे. म्हणूनच उगमने २० गावातील जिल्हापरिषद शाळामधून पर्यावरण शिक्षणाच्या तासिका सुरु केल्या आहेत. यात विद्यार्थ्यांना फळझाडे, फुलझाडे, विविध परीपारिक बियाणे, पशु, पक्षी, प्राणी, परिसर स्वच्छता, आरोग्य या बाबत खेळ, प्रश्नमंजुषा या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. यात वृक्ष संवर्धन पाण्याचा योग्य वापर याचेही महत्व सांगितले जात आहे.

मुलांना बीज संकलन करणे, आजोबा १५ वर्षाचे असताना त्यांचा आहार काय होता, वडील १५ वर्षाचे असताना त्यांचा आहार काय होता व मुले १५ वर्षाच्या मुलाचा काय आहार आहे. यातून अन्नातील जैवविविधतेच अभ्यास होतो, शाळास्तरीय जैवविविधता कोपरा तयार करण्यात आला. ह्यामध्ये स्थानिक व दुर्मिळ बियाणे संकलित केली आहेत.

तसेच उगमस्थरावर पिटारा तयार करण्यात आला आहे. ह्यामध्ये कॅमेरा, दुर्बीण, तापमापी, मापे, पुस्तके, रानभाज्या, पिके, कीटक अश्या विविध घडीपत्रिका उपलब्ध आहेत. ह्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पाणी तपासणे, रोप तयार करणे, चौरस पद्धतीने गवत मोजमाप करणे, पक्षी ओळखणे अशी विविध उपक्रम शिवार फेरी, चर्चा व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकविण्यात येत आहे. शिकवणीसाठी ५ ते ८ पर्यंत च्या विद्यार्थाच्या सहभाग आहे.

बीज संकलन: शाळेतील एक उपक्रम

मुलाना बीज संकलन करण्यासाठी स्पर्धा घेण्यात येते. जो विद्यार्थांना सर्वात जास्त बीज संकलन करेल त्याला बक्षीस दिल्या जाते. बीज संकलनातून विषय अभ्यास कसा केला जातो.
– बीज संकलन करण्यासाठी जेव्हा मुळे शेतात फिरतात तेव्हा शारीरिक शिक्षण होते.
– कोणत्या झाडाची किती बीज आहे हे जेव्हा मोजतात तेव्हा गणित शिकतात
– बियांचा आकार जेव्हा समजतात तेव्हा भूमिती शिकतात.
– बीज कोणत्या भागातून/ टापूतून आणल्या आहेत त्यावरून ते भूगोल शिकतात
– बीज कोणत्या ऋतूत लागवड करतात तेव्हा ते विज्ञान शिकतात
– बियाचे नाव काय आहेत यावरून ते भाषा शिकतात.

महिला सक्षमीकरण

महिलांचे सक्षमीकरण होऊन ग्रामविकासात त्यांचा सहभाग वाढवा याच हेतूने सावित्रीबाई फुले म्युचल बेनिफिट ट्रस्ट च्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी हा उपक्रम आहे. थोडक्यात हे पूर्णतः महिलांनी चालवलेले मायक्रो फायनान्स आहे. यात महिलाच चेअरमन महिलाच अध्यक्ष आहेत. एकूण साडेचार हजार महिलांनी हा आर्थिक डोलारा उभा केला असून वार्षिक पाच कोटींची उलाढाल यातून होत आहे. साडेचारशे महिला बचतगट यात समाविष्ट आहेत. यात व्हिलेज डेवलपमेंट असोसियेशन म्हणजेच व्ही डी ए असून क्लस्टर असोसियेशन या मध्ये १५ ते २० गावांचा समावेश असतो. एकूण पाच जिल्ह्यात हा उपक्रम असुन या पाच जिल्ह्याच्या या उपक्रमावर अनिक मायक्रो फायनान्स चे नियंत्रण आहे.
यात कर्जफेडीचे प्रमाण चांगले आहे. महिलांचे आर्थिक व्यवहार योग्य कारणासाठी आणि काटकसरीचे नियोजनबद्ध असतात हे सिद्ध झाले आहे. काही महिला बचत गटांनी पाच ते सहा वेळा कर्ज घेऊन वेळेपूर्वीच कर्जफेड करून दाखविली आहे.

दुष्काळ निर्मुलन कार्यक्रम

इडलगिव्ह फौंडेशन मुंबई यांच्या वतीने दुष्काळावर मात करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात आला आहे. माथा ते पायथा ही देखील दुष्काळ निवारण निगडीत संकल्पना असुन आमदरी आणि तेलंगवाडी या गावातून हा उपक्रम राबविला आहे. हा पूर्ण आदिवासी वस्तीचा भाग आहे. हा उपक्रम इडलगिव्ह या संस्थेच्या सहयोगाने होत असून गेल्या दोन वर्षांच्या काळात आमदरी गावात ९० टक्के पाणलोट भाग उगमने नाला खोलीकरण सीएनबी, सीसीटी अश्या पाणलोट क्षेत्र विकासात्मक कामातून पाण्याखाली आणला आहे. आमदरी गावामध्ये एकेकाळी ८० टक्के कुटुंब स्थलांतरित होत होती आता हि संख्या १० टक्केवर आली आहे. आता आमदरी करटूले व सीताफळ साठी प्रसिध्द आहे. पाणी पातळी वाढल्याने शाश्वत उपजीविका स्थानिकांना मिळालेली आहे.
आमदरी गाव हे पाणलोट क्षेत्र विकासाच्या अंगणी आदर्श गाव आहे.

कयाधूनदी पुनरुज्जीवन संकल्पना

हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख नदी कयाधू आता मृत होत आहे. ऐककाळी बारमाही वाहणारी ही नदी आता फक्त पावसाळ्यात वाहतांना दिसते. कयाधू नदी पुन्हा वाहती करण्यासाठी आपण सरकार किंवा इतरांची वाट पाहत किती दिवस घालवणार आहोत. वातावरणातील बदल, वैश्विक तापमान, पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास, मानवाच्या हव्यासापोटी नैसर्गिक साधन सामग्रीचे होणारे अतिशोषण अशामुळे कयाधू नदी मृत झाली आहे. त्याचा परिणाम ही आपणास भोगावा लागत आहे. दुष्काळ व मागासलेल्या जिल्हाच्या यादीत व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जिल्हा म्हणूनही जिल्हा ओळखला जात आहे. हा जो कलंक लागला आहे तो कलंक पुसून टाकण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्थेने १०० जनासमवेत १०० किमी अंतराची पायी दिंडी काढली होती. तसेच ११७५ किमी अंतराच्या लहानमोठ्या ओढ्याचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये सध्याचा जलसाठा, भविष्यकालीन जलसाठा, पाणलोट क्षेत्र विकासाचे झालेले रचनात्मक कार्य व भविष्यातील रचनात्मक करावयाची कामे अशी १३१ गावाची नकाशे तयार करण्यात आली आहेत.

Share: