पुण्यात महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड, युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

पुणे : वातावरणातील गारठा वाढू लागला आहे. या गारठ्यासह देखण्या स्ट्रॉबेरीला चांगलाच बहर येऊ लागला आहे. स्ट्रॉबेरी म्हणलं की आपल्याला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्वरची आठवण होते. मात्र, स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वरला जाण्याची गरज पडणार नाही. कारण पुणे जिल्ह्यातील अक्षय टेमकर या युवकानं आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक घेतलं आहे. गावडेवाडी येथील अक्षय बाबाजी टेमकर या कृषी पदवीधारक युवकाने काळया मातीत स्ट्रॉबेरी पीक घेऊन आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांपुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे
आदर्शगाव गावडेवाडी माजी उपसरपंच बाबाजी टेमकर हे नेहमीच आपल्या शेतीत विविध प्रयोग करत असतात. त्यांचा मुलगा अक्षयनं कृषी विषयाची पदवी संपादन केली. इतरांप्रमाणं नोकरीच्या मागे न लागता स्वत:च्या शेतातच काम करून नवनवीन पिके घेण्याकडे लक्ष देऊ लागला आहे. अक्षय स्वत:च्या शिक्षणाचा वापर करुन वडिलांना शेतात मदत करू लागला आहे.
साताऱ्याहून स्ट्रॉबेरीची रोपं मागवली
अक्षय टेमकर त्यांच्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतो. अक्षयनं साताऱ्याहून स्ट्रॉबेरीची रोपं आणून लागवड केली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरीला प्रतिकूल हवामान नसतानादेखील त्यांनी 11 गुंठे क्षेत्रात 6100 स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. स्ट्रॉबेरीच्या झाडांची निगा राखल्यानं आज त्यांना उत्पादन चालू झाले आहे. रोपं आणि औषधं यासाठी त्यांना आत्तापर्यंत 60 ते 70 हजार रुपये खर्च आलाय. हिवाळ्यातील थंडीच्या कालावधीचा अभ्यास करुन योग्य लागवड केल्यास आंबेगाव परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड करता येऊ शकते, असं अक्षय टेमकर यांनी सांगितले.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
अक्षय टेमकर याने वडील बाबाजी टेमकर व आई सविता टेमकर यांच्या मदतीने यशस्वीपणे स्ट्रॉबेरीची लागवड केली. स्ट्रॉबेरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा मार्ग अक्षयनं निवडला. इंस्टाग्रामच्या सहाय्यानं @shetkariraja या नावाने अकाऊंट तयार करुन आत्तापर्यंत त्याने घेतलेल्या पिकाची माहिती व छायाचित्रे अपलोड केली.ऑक्टोबर महिन्यात लागवड केल्यानंतर आता दिवसाआड स्ट्रॉबेरीचा तोडा चालू झाला आहे.
स्ट्रॉबेरीचे तोडे दिवसाआड सुरु झाले असून आता स्थानिक बाजारपेठ व मॉल मधून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे, असल्याची माहिती अक्षय टेमकर यांनी एपीएमसी न्युजला दिली. यावर्षी महाबळेश्वर परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड अतिवृष्टीमुळे कमी झाल्यामुळे अक्षयने लावलेल्या स्ट्रॉबेरीला अडीचशे ते साडेतीनशे रुपये बाजार भाव मिळत आहे.
नुकतेच चालू झालेल्या स्ट्रॉबेरी पिकाचे अजून तीन ते चार महिने उत्पादन सुरू राहणार आहे. तीन ते चार महिन्यात तीन ते साडेतीन टन उत्पादन घेऊन उत्पादन खर्च वजा जाता दोन ते अडीच लाख रुपये मिळतील,असा विश्वास अक्षय टेमकर याने व्यक्त केला