भारनियमाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा ‘महावितरणा’ वर मोर्चा

24
0
Share:

शेतीपंपाला दिवसा वीजकपात केली जाते, दोन दिवस वीजकपात केल्याने कोगे व पाडळी खुर्द व परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कोगे उपकेंद्रावर धडक मारली. या वेळी अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले व वीज भारनियमन रद्द न केल्यास महावितरण ताराबाई पार्क येथे बैलगाडीसह मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

कोगे उपकेंद्रांतर्गत महे, सांगरूळ, बहिरेश्‍वर, वाकरे, पाडळी खुर्द, कसबा बीड, आरे येथे सुमारे दोन हजार शेतीपंपधारक आहेत. रात्रीची वीजकपात केली जाते. दोन दिवस दिवसा वीजकपात केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी उपकेंद्रावर मोर्चा आणला. तानाजी मोरे म्हणाले, ‘‘दोन दिवस सलग वीजकपात केली आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. उन्हाळा वाढला असून, पिकांना २५ दिवस पाणी नाही. त्यामुळे पिके वाळू लागली आहेत. दिवसा वीज चालू असताना तांत्रिक बिघाड, सांगून वीजकपात केली जाते.’’

सरदार पाटील म्हणाले, ‘‘दोन दिवस वीज भारनियमन सुरू असताना कनिष्ठ अभियंता प्रवीण पाटील रजेवर कसे जातात. उपकेंद्रावर फोन उचलला जात नाही, माहिती व्यवस्थित दिली जात नाही. परिस्थिती न सुधारल्यास उपकेंद्रास टाळे ठोकू.’’ राजाराम पाटील, बाळासाहेब पाटील यांनी जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

ऑपरेटर आर. एस. कुंभार म्हणाले, ‘‘पुईखडी येथून तांत्रिक बिघाड असून, चंबुखडी येथून रोड मिळेना झाला आहे.’’ या वेळी शेतकरी रंगराव यादव, जोतीराम पाटील, गणपती मिठारी, नारायण मोरे, तानाजी पाटील, जी. डी. पाटील, वैभव व वरुटे आदी उपस्थित होते.

Share: