बुलडाणा : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार या कृषी विभागाच्या उपक्रमावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना कळेल की किती आक्रोश आहे,” असे राजू शेट्टी म्हणाले. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडूंवर आरोप करणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी असेही राजू शेट्टी म्हणाले.माजी खासदार राजू शेट्टी हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राजू शेट्टींनी बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.“ठाकरे सरकारने कृषी मंत्री आणि खात्याच्या अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तो योग्य असेल पण त्यांना बांधावर जाऊन कळेल की शेतकऱ्यांचा किती आक्रोश आहे. त्यानंतरच त्यांचे डोळे उघडतील. कारण सरकारने जी कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याचा मोजक्या 10 ते 15 टक्के शेतकऱ्यांना फायदा होईल,” असेही राजू शेट्टी म्हणाले.“शेतमालाला भाव योग्यरित्या मिळाला पाहिजे. तेव्हाच शेतकरी आर्थिक अडचणीतून सुटतील,” असेही राजू शेट्टींनी यावेळी सांगितलं.दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. त्या आरोपांचे समर्थन करत हा आरोप योग्य असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले.तर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंवर टीका केली होती. त्यावर सत्य बोचत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या दारात जावे. तसेच असे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी अशी मागणी राजू शेट्टींनी  केली.