आईच्या उपचारासाठी व्याजाने घेतलेल्या एक लाखाच्या बदल्यात 32 लाख रुपये रोख आणि साडेसहा एकर जमीन; बारामतीत सहा सावकारांवर गुन्हा दाखल !

6
0
Share:

आईच्या उपचारासाठी व्याजाने घेतलेल्या एक लाख रुपयांच्या बदल्यात 32 लाख रुपये रोख आणि साडेसहा एकर जमीन घेतल्यानंतरही पुन्हा पैशांसाठी तगादा लावणाऱ्या सहा सावकारांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील नामदेव ढोले यांनी महादेव सांगळे यांच्याकडून आईच्या उपचारासाठी 1 लाख रुपये 10 टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात एक एकर जमीन लिहून दिली होती. पुढे व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी फिर्यादीच्या भावाची दीड एकर जमीन संबंधित सावकाराने स्वत:च्या नावे करून घेतली. त्यानंतरही वसुलीसाठी तगादा सुरू असल्यानं फिर्यादीने आणखी दोन एकर जमीन मल्लेश कदरापूरकर यांच्याकडे गहाण ठेवून त्यांची रक्कम महादेव सांगळे याला दिली.
फिर्यादीने टप्प्याटप्प्याने तब्बल साडेसहा एकर जमीन आणि 32 लाख रुपये रोख दिले. मात्र तरीही व्यवहार मिटत नसल्याने अखेर त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. या तक्रारीवरून महादेव सांगळे, आशा सांगळे, मल्लेश कदरापूरकर, बिभीषण ढोले, भास्कर वणवे आणि दत्तात्रय वणवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Share: