शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या हातात पुन्हा ‘शिवबंधन’

10
0
Share:

शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या हातात पुन्हा ‘शिवबंधन’

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या पारनेरच्या नगरसेवकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत घरवापसी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर हे नगरसेवक शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत चारच दिवसांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले होते, त्याच लंके यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांनी मातोश्रीवर पुन्हा शिवबंधन हाती बांधले.

अहमदनगरमधील पारनेरचे पाच नगरसेवक सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र चारच दिवसात त्यांची सेनेत घरवापसी झाली. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये झालेले हे पक्षांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. त्यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला होता.

राष्ट्रवादीत प्रवेश केला”, असं शिवसेनेचे नाराज नगरसेवक म्हणाले होते.

“माजी आमदारांच्या हुकूमशाहीमुळे शिवसेना सोडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही नाराजी नाही. पण, माजी आमदारांमुळे पक्ष सोडवा लागला”, अशी खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.

“कोणत्याही विकासाची कामे होत नव्हती, म्हणून आम्ही राष्ट्रवादी जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही पुन्हा शिवसेनेत जाणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास आम्ही ‘मातोश्री’वर जाऊन इथली परिस्थिती मांडू. पण, तूर्तास तरी शिवसेनेत पुन्हा परतण्याचा विचार नाही”, असं नगरसेवक म्हणाले होते. मात्र अवघ्या काही तासात त्यांचा निर्णय बदलला आणि त्यांनी पुन्हा सेनेत प्रवेश केला.

पारनेरमध्ये नेमकं काय झाले?

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला. शिवसेनेला रामराम ठोकत त्यांनी 4 जुलै रोजी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हेदेखील उपस्थित होते. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

यानंतर शिवसेनेने देखील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या रणनीतीचा वचपा काढत कल्याणमध्ये नवी राजकीय खेळी केली. यानुसार शिवसेनेनं कल्याण पंचायत समितीमध्ये थेट भाजपशी हातमिळवणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला. पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना कळवला होता

Share: