राज्याजी सत्ता आमच्या हातात द्या,महाराष्ट्रात सुतासारखा करू,तृतीयपंथीयाची मागणी

23
0
Share:

पुणे : “राज्याची सत्ता आमच्या हातात द्या, चँलेंज देऊन सांगतो, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करु”, अशी मागणी तृतीयपंथीय असलेल्या चांदणी गोरे यांनी  केली आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 3 आठवडे उलटले तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. राज्यात नेमकी सत्ता कधी स्थापन होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले  आहे. यामुळे “आमच्या हातात सत्ता द्या”, अशी मागणी तृतीयपंथी चांदणी गोरे यांनी केली  आहे.

“नमस्कार माझे नाव चांदणी आहे. मी एक तृतीयपंथी आहे. निवडणुका होऊन गेले 25 दिवस झाले आहेत. तरीही राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही. असं का होत आहे. राज्याचे राज्यपाल नागपूरवाल्यांचे ऐकतात की राष्ट्रपती गुजरातवाल्यांचे ऐकतात. हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे,” असं चांदणी यांनी म्हटलं आहे.

“सर्वसामान्य जनतेचे का हाल होत आहेत. कांद्याचे दर किती कोसळले आहेत. महिला असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांचे हाल किती चालले आहेत. पिकांचे नुकसान, त्यांच्या विम्याचे प्रकरण अरे कुठून नेऊन ठेवला आहे, माझा महाराष्ट्र” असा प्रश्नही चांदणी यांनी उपस्थित केला आहे.

“आज आमच्या तृतीयपंथीयांना जाग येत आहे. माझं चॅलेंज आहे, आमचं सरकार आमच्या हातात द्या सगळे सुतासारखे सरळ येतील. सगळी प्रकरण योग्य मार्गे लागतील.” असेही त्या म्हणाल्या आहेत.

राज्यात सत्तासंघर्ष कायम

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र भाजपने शिवसेनेची इच्छा नसल्याचं रविवारी (10 नोव्हेंबर 2019) सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष शिवसेनेला आवताण दिलं होतं.

शिवसेनेने सोमवारी रात्री (11 नोव्हेंबर 2019) राज्यपालांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागली. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडच्या बैठकांचं सत्र सुरु होतं. त्यातच झालेल्या दिरंगाईमुळे शिवसेनेला केवळ सत्तास्थापनेचा दावा करता आला, मात्र बहुमतासाठी लागणारी दोन्ही पक्षांची पाठिंबा पत्रं राज्यपालांकडे सादर करता आली नाहीत. आवश्यक संख्याबळ दाखवण्यासाठी शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ मागितला. पण राज्यपालांनी त्याला नकार दिला.

राज्यपालांनी लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसला मंगळवारी रात्री (12 नोव्हेंबर 2019) 8.30 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र त्याआधी राष्ट्रवादीनेही मुदतवाढ मागितली. परंतु राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही वेळ वाढवून देण्यास नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने मंगळवार 12 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

Share: