केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऍग्रोविजन कृषी प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न

5
0
Share:

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऍग्रोविजन कृषी प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न

विदर्भातील कृषी क्षेत्रात परिवर्तनात ॲग्रोव्हिजनचा मोठा वाटा ठरत आहे. या वर्षी २२ ते २५ नोव्हेंबरदरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यामध्ये कृषी तंत्रज्ञान कार्यशाळा, तंत्रज्ञान सादरीकरण दालने, कृषिविषयक चर्चासत्रे, शेतीला दिशा देणाऱ्या परिषद, पशू प्रदर्शन राहतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

रेशीमबाग येथे होणाऱ्या ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाचे हे अकरावे वर्ष आहे. २२ नोव्हेंबरला मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. २३ नोव्हेंबरला विविध कार्यशाळांचे उदघाटन केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री गिरीराजसिंह यांच्या हस्ते होणार आहे. २४ नोव्हेंबरला कृषी व अन्न तंत्रज्ञान या विषयावरील परिषदेचे उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल करणार आहेत, असे गडकरी यांनी सांगीतले.

ग्रामीण, कृषी व वनक्षेत्राला प्रोत्साहन व रोजगार मिळावा म्हणून विदर्भामध्ये ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. जैवइंधन, दुग्ध व्यवसाय, मधमाशीपालन यासारखे कृषीपूरक व आर्थिकदृष्टया सक्षम असणारे कृषी उद्योग स्थापन करुन ग्रामीण व आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावणे हा ॲग्रोव्हिजनचा मुख्य उद्देश आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहीर येथे भाजीपाला कटींग व पॅकेजिंग युनिट आहे. त्यामार्फत दुबईमध्ये ३० कंटेनर भाजीपाला निर्यात होतो. नवीन उत्पादीत संत्रा मावा बर्फीमुळे विदर्भातील संत्रा व दुग्ध उत्पादकांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. हे ॲग्रोव्हिजनचे यश आहे.

चंद्रपूर, गोंदिया यांसारख्या वनव्याप्त जिल्ह्यांमध्ये मधाचे उत्पादन वाढविण्यासाठी दोन लाख मधुमक्षिका पेटीची मागणी करण्यात आली आहे. या जिल्हयात जट्रोफा या जैवइंधनाच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या बिया वाटपाचही कार्यक्रम सुरू करण्यात आल्याचे गडकरी म्हणाले. ॲग्रोव्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, आयोजन समिती सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर, एम.एस.ई. विकास संस्थेचे संचालक पी.एस. पार्लेवार या वेळी उपस्थित होते.

Share: