Apmc News:प्रशासनाचा अजब कारभार , कोल्हापुरात सकाळी काढलेला जमावबंदीचा आदेश रात्री मागे

22
0
Share:

प्रशासनाचा अजब कारभार , कोल्हापुरात सकाळी काढलेला जमावबंदीचा आदेश रात्री मागे

कोल्हापूर: कोल्हापुरात लागू केलेला जमावबंदीचा आदेश (Ban Order) एका दिवसात मागे घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या अजब निर्णयाचा सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतर निर्बंध हटवण्यात आले आहेत. प्रशासनावर काल (12 ऑगस्ट) सकाळी काढलेला आदेश रात्रीपर्यंत मागे घेण्याची नामुष्की ओढवली.

प्रशासनाने घेतलेल्या जमावबंदीच्या आदेशाचा सर्वच स्तरातून विरोध झाल्यामुळे तो मागे घेतल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर आंदोलन-उपोषणासारखे प्रकार टाळण्यासाठी 12 ते 24 ऑगस्ट अशा 13 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रशासनाने सांगितलं होतं.

गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्तांना मदत पोहचण्यास विलंब होत असल्यामुळे प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. या गोंधळात भर पडू नये, यासाठी खबरदारी म्हणून बंदी लागू करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं.

मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण काल झाला, तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि 24 ऑगस्टला दहीहंडी असल्यामुळे याचं औचित्य साधून आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष/संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनं होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
जिल्ह्यात एखादी अनपेक्षित घटना घडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2019 रात्री 12 वाजेपर्यंत बंदीचे आदेश जारी केले होते. परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

प्रशासनाचा अजब कारभार, कोल्हापुरात बंदी आदेश
समस्यांचा विळखा

कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिक पुराने हैराण आहेत. दोन्ही जिल्ह्यांना आठवडाभरापासून पुराने वेढा दिला आहे. महापुराचं पाणी ओसरत असलं, तरी पूरग्रस्तांपुढे आव्हानांचा पूर मात्र कायम आहे. शुद्ध पाणी, खाद्यपदार्थ, शेती, रोगराई, राहण्याची व्यवस्था, मालमत्तेची हानी, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, यासारख्या समस्यांचा विळखा सैल होताना दिसत नाही.

Share: