बँकेच्या संचालकासह इतक्या जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल; सहकार क्षेत्रात खळबळ
बँकेच्या संचालकासह इतक्या जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल सहकार क्षेत्रात खळबळ
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०१३ मध्ये राबविलेल्या वादग्रस्त शिपाई आणि लिपिक पदाच्या भरतीत काही उमेदवारांना गुण वाढवून दिले होते. त्याप्रकरणी बँकेच्या संचालकांसह ११ जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ मार्च रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहकार क्षेत्रासोबत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात फिर्यादी असलेले रवींद्र शिंदे यांच्यासह तिघांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
संभाषणाचा व्हिडीओ लाचलुचपत विभागाकडे
शेखर धोटे यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात २०१३ रोजी ही भरती २४ जागांसाठी झाली होती. बँकेच्या निवड समितीतील एक सदस्य रवींद्र शिंदे यांनी व्हिडीओ शुटिंग घेतली. त्या मुलाखतीत गुण वाढवून देऊन रक्कम गोळा करण्याचे संभाषण होतो. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ऑगस्ट २०१७ ला एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानुसार तत्कालीन बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार संचालक, ३ निवड समितीतील अधिकारी यांच्यासह तक्रारकर्ते रवींद्र शिंदे यांना आरोपी केले होते.