शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार-नाना पटोले
शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे रखडले
शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव नाही.
सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी विरोधी पक्षांची मागणी
मुंबई: राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
राज्याला गारपिटीसह पावसाचा जबरदस्त तडाखा बसलाय. सलग दोन दिवस सुरू असलेल्या गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतली पिकं मातीमोल झाली आहेत. 
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. परंतु शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही.त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत व मदतही जाहीर केली जात नाही.
राज्यात सत्तेवर असलेल्या सरकाराला शेतकऱ्यांच्या हिताशी काही देणंघेणं नाही. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे त्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतातील उभे पीक वाया गेले
आहे. सरकारने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली पाहिजे पण पंचनामे करण्यास कर्मचारीच नाहीत. सरकारी कर्मचारी संपावर आहेत आणि सरकार टाईमपास करत आहे. पंचनामे करण्यास उशिर होत असेल तर सरकारने तातडीने रोख मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करावी.
महाविकास आघाडी सरकार असताना नैसर्गिक संकट आले असता तातडीने १० हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली होती, नंतर पंचनामे करुन मोठे पॅकेजही दिले. पण शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव नाही. 
शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती असावी लागते ती या सरकारकडे नाही. दोन दिवसावर गुढी पाडव्याचा सण आहे, हा सण कसा साजरा करायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. असेही नाना पटोले म्हणाले.