सर्वात धक्कादायक बातमी! सोलापुरात तांदळात थेट प्लास्टिकची भेसळ?
शालेय पोषण आहाराच्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ, सोलापुरात आरोग्य धोक्यात
सोलापूर : आपण बाजारातून किंवा रेशन कार्डच्या आधारावर जे धान्य घेतो त्यामध्ये काही प्रमाणात भेसळ असलेलं आपण बघतो. गहू, तांदळामध्ये बऱ्याचदा छोटे मातीचे खडे आणि इतर कचरा आपल्याला बघायला मिळतो. धान्य शेतातून येत असल्याचं आपण गृहित धरुन सर्व धान्य साफ करतो. पण या धान्यात थेट प्लास्टिकची भेसळ केली जात असल्याचं तुम्हाला सांगितलं असं तुम्हाला सांगितलं तर? कदाचित तुमचा आधी विश्वास बसणार नाही. पण तसा प्रकार सोलापुरातून समोर आला आहे. सोलापुरात शालेय पोषण आहाराच्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भेसळयुक्त तांदळामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विशेष म्हणजे शालेय पोषण आहारासह रेशनच्या दुकानांमध्ये देखील प्लास्टिकचा तांदूळ भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. प्लास्टिकच्या तांदळाच्या मुद्द्यावरुन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. सांगोला तालुक्यातील घेरडीच्या सरपंच सुरेखा पुकळे यांनी पुराव्यासह भेसळयुक्त तांदळाचा प्रकार उघडकीस आणला आहे.
आमदार शहाजी बापू पाटील यांनी भेसळयुक्त प्लास्टिकच्या तांदळाबाबत तहसीलदारांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत.पण सोलापूर जिल्ह्यात प्लास्टिकच्या तांदळाचा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अन्न व भेसळ विभागासह जिल्हा प्रशासनाकडून भेसळयुक्त तांदळाबाबत ठोस निर्णय होण्याची गरज असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जात आहे.