स्वस्त धान्य दुकानदार वाईन विक्रीसाठी उत्सुक; शासन निर्णयाकडे डोळे
महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक हजार स्केअर फुट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेला किराणा दुकानात तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचे ठरवले आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्ष घणाघात करत आहे. तर द्राक्ष बागायतदार आणि वाईन निर्मिती करणारे उद्योजक सरकारच्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक करत आहेत.
यादरम्यान आता अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकान महासंघाची या गदारोळात इंट्री झाली आहे. महासंघाचे अध्यक्ष डी एन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष प्रक्रियातुन तयार होणाऱ्या वाईन विक्रीतून फायदा मिळणार असेल तसंच यामुळे शेतकऱ्यांना जर आर्थिक फायदा मिळत असेल आणि शासन ग्रामीण भागात वाईन विक्री करण्यासाठी तत्पर असेल तर राज्यातील जवळपास ५५ हजार स्वस्त धान्य दुकान वाईन विक्रीची जबाबदारी घेण्यास नेहमीच तयार असतील. अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकान महासंघाच्या या वक्तव्यामुळे राज्यात सुरू असलेल्या वाइन-वाइन या खेळात नवीनच मोड आल्याचे बघायला मिळत आहे.
राज्यात १९५७ पासून गरीबांच्या उद्धारासाठी स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यात आले आहेत. आजही गरीब शेतमजूर तसेच कामगार वर्गासाठी स्वस्त धान्य दुकान एखाद्या वरदानाप्रमाणे कार्य करत आहे. स्वस्त धान्य दुकान कोरोना काळात बेरोजगार झालेल्या लोकांसाठी व मध्यमवर्गीय कुटुंबियांसाठी एक संजीवनी म्हणून उदयास आले, स्वस्त धान्य दुकानाअंतर्गत कोरोना काळात राज्यातील सर्व गरीब जनतेला मोफत धान्याचे वाटप करण्यात आले, यामध्ये अनेक स्वस्त धान्य दुकानदारांचे बळी गेल्याचे देखील बघायला मिळाले होते. त्यामुळे कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांनी कार्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नुकतेच राज्य शासनाने द्राक्ष बागायतदारांना दिलासा देण्यासाठी व त्यांना आर्थिक सुबकता प्राप्त होईल या उद्देशाने राज्यातील १ हजार स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली. शासनाचा हा प्रयोग द्राक्ष बागायतदारांच्या हिताचा ठरला तर भविष्यात राज्यातील स्वस्त धान्य दुकान शासनाचे प्रतिनिधी म्हणून वाईन विक्री करण्यास उत्सुक असल्याचे महासंघाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले.