कांदा खरेदीबाबत नाफेडने बाजारात हस्तेक्षेप करावा, केंद्र सरकारचे निर्देश
केंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला निर्देश दिले आहेत.कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, नाफेडने ताबडतोब कांदा खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे.गेल्या दहा दिवसात शेतकऱ्यांकडून ९०० रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दराने सुमारे ४००० मेट्रीक टन कांद्याची थेट खरेदी केल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.नाफेडने ४० खरेदी केंद्रे उघडली असून, तिथे शेतकरी त्यांचा कांदा विकू शकतात. त्याचे पैसे ऑनलाइन त्यांना मिळू शकतात.नाफेडने खरेदी केंद्रांवरुन दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद आणि कोची या ठिकाणी साठा नेण्याची व्यवस्था केली आहे.दरातील ही घसरण इतर राज्यांतील एकूणच वाढलेल्या उत्पादनामुळं तसेच देशातील प्रमुख उत्पादक जिल्ह्यांतील म्हणजेच नाशिकमधील पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी झाल्यामुळं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.