कोरोना काळात मुलांबाबत घ्या काळजी; वाचा सविस्तर
कोरोना संसर्गाचा धोका वाढत असतानाच केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. पाच वर्षाखालील मुलांना मास्क वापरणे बंधनकारक नाही, तसेच १८ वर्षाखालील मुलांना कोरोना झाल्यास त्यांच्यावर उपचार करताना अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीचा वापर करू नये. तसेच त्यांचावर उपचार करण्यासाठी स्टेरॉयडचा वापर केला जात असेल तर १० ते १४ दिवसाात त्याचे डोस कमी करावेत, अशा सूचना नव्या गाईडलाईनमध्ये देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये पाच वर्षाखालील मुलांना मास्क वापरण्यास देऊ नये. तसेच आई-वडिलांच्या निगराणीत ६ ते ११ वर्षा दरम्यानची मुलं सुरक्षित आणि योग्य पद्धतीने मास्कचा वापर करू शकतात, असं केंद्राने म्हटलं आहे.
१२ वर्ष आणि त्यावरील अधिक वयाच्या लोकांना मात्र मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. ओमिक्रॉनमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने तज्ज्ञांनी आढावा घेऊन ही गाईडलाईन ठरवली आहे. इतर देशांतील आकडेवारीनुसार ओमिक्रॉनमुळे होणारा आजार फारसा गंभीर नाही. मात्र, संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने काळजी घेणं आवश्यक आहे.
कोरोना संसर्गाची लक्षणे नसलेले आणि सौम्य असलेल्यांच्या उपचारासाठी अँटीमायक्रोबियल्स किंवा प्रोफिलैक्सिसची शिफारस केली जाऊ शकत नाही. जोपर्यंत सुपरअॅडेड इन्फेक्शनची लक्षणे वाटत नाही किंवा त्याची शंका वाटत नाही तोपर्यंत मध्यम आणि गंभीर आजार असलेल्यांना अँटीमाइक्रोबियल्स औषधे जोपर्यंत देऊ नये असंही म्हटलं आहे. स्टेरॉयडचा वापर योग्यवेळी, योग्य डोस आणि योग्य कालावधीसाठी दिला जावा, असंही म्हटलं आहे.