Grape Damage: द्राक्षाचे नुकसान आता बेदाणा निर्मितीच्याही वाढल्या अडचणी, काय आहेत समस्या ?
नवी मुंबई : अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि आता वाढलेला गारठा यामुळे द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष काढणीला आले असतानाच वाढेलेल्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. द्राक्षांचे नुकसान झाले तरी बेदाणा निर्मीतीमधून उत्पन्न पदरी पाडून घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांकडे होतो. शिवाय त्याअनुशंगाने शेतकऱ्यांनी तयारीही सुरु केली होती. मात्र, याकरिताही आता अडचणींचा सामना करावा लागणार आहे.सांगली जिल्ह्यामध्ये बेदाणा निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र, यासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. शिवाय बेदाणा पॅकिंगसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची आयातदेखील बंद झाल्याने एकतर निर्मीतीमध्ये अडचणी येत आहेत तर दुसरीकडे खर्चही वाढणार आहे. त्यामुळे द्राक्षामध्ये झालेले नुकसान बेदाण्यातून काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस फोल ठरत असतानाचे चित्र आहे. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात देखील द्राक्ष उत्पादकांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे.
कच्च्या मालाची आयात बंद, वाहतूकीचाही खर्च वाढला
बेदाणा तयार करण्यासाठी लागणाऱ्या डिपिंग ऑइल, कार्बोनेट, गंधक आणि कोरोगेटेड बॉक्ससाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात बंद आहे. त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पॅकिंगला लागणाऱ्या साहित्यातही वाढ झाली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून बेदाणा उत्पादन खर्चात 25 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. द्राक्षाच्या दरात मोठी घट झाली आहे शिवाय दर्जाही ढासळला असल्याने बेदाणा निर्मितीचा पर्याय शेतकऱ्यांसमोर होता मात्र, यामध्येही अडचणी असल्याचे समोर येत आहे.
अतिरिक्त खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवरच
एक टन बेदाणा तयार करण्यासाठी सुमारे 25 हजार रुपये इतका खर्च येतो. मात्र या दरवाढीमुळे एका टनाला 3 ते 4 हजार टन इतका खर्च वाढणार आहे. त्यामुळे 1 टन बेदाणा निर्मितीसाठी 28 ते 29 हजार इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चात वाढ होत असल्याने अतिरिक्त खर्चाचा बोजा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर पडणार आहे. आगोदरच द्राक्ष उत्पादनावर शेतकऱ्यांचा अधिकचा खर्च झाला आहे. असे असताना पुन्हा बेदाणा निर्मितीसाठी अणखीन खर्च यामुळे यंदाचे वर्ष केवळ नुकसानीचे ठरत आहे. शिवाय उत्पादनावर खर्च करुन परत दर किती मिळणार याबाबत बेदाणा उत्पादक शेतकरी हे अनभिज्ञ आहेत.