नाशिक कोर्टाकडून दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया काय?
नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. दिव्यांगांच्या मागण्याकरीता केलेल्या आंदोलनावेळी महापालिका आयुक्तांवर हात उगारल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, बच्चू कडू यांना वरच्या कोर्टात अपिल करेपर्यंत जामीनही मंजूर करण्यात आल्याने बच्चू कडू यांनी दिलासा मिळाला आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी काही मौजमजा म्हणून आंदोलन केलं नाही. उलट आयुक्तांनी प्रश्नांची दखल का घेतली नाही? याची विचारणा करून कारवाई होणं अपेक्षित होतं, असं बच्चू कडू म्हणाले.
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही नाशिकमध्ये दोन आंदोलने केली. तीन तीन वर्ष पालिका आयुक्त दिव्यांगांचा निधी खर्च करत नव्हते. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागलं. मला फोन केल्यानंतर मी आयुक्तांना दोन पत्रं लिहिली. आमदाराच्या पत्रालाही उत्तर आलं नाही. सामान्य माणसाचा अधिकार तर गेला खड्ड्यात पण माझ्या पत्रालाही उत्तर आलं नाही. सगळी ऐशी की तैशी आयुक्तांनी केली. त्यामुळे कंटाळून आम्ही इथे आलो. मौजमजा म्हणून आलो नव्हतो, असं बच्चू कडू म्हणाले.