सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती..., अब्दुल सत्तार यांचं बळीराजाला आवाहन, अधिकाऱ्यांनाही दिले हे आदेश
-महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांकडून अवकाळी पावसाची गंभीरपणे दखल, तातडीने लागले कामाला
नवी मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात तर खोरी टिटाने भागात गारपीट पडल्याची माहिती मिळत आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्येही पाऊस पडल्याची माहिती मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. या अवकाळी पावसाचं नुकसान पाहता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय त्यांनी या नुकसान भरपाईची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना पंचनामा करुन नुकसान भरपाईबद्दलचे आदेश दिले आहेत.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडलाय. संबंधित भागांमध्ये तातडीने पंचनामे करावे, असा आदेश अब्दुल सत्तार यांनी दिलाय. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी कृषीमंत्र्यांनी याबाबतचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
‘सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती…’
“महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, काही शेतकरी हवालदिल झाले आहेत, सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, तुमचं जे नुकसान झालंय त्या सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामा झाल्यानंतर सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. पण मी पंचनामे करण्याचे आदेश तातडीने दिले आहेत. अधिकारी, जिल्हाधिकारी सर्व पंचनामे करुन आमच्याकडे माहिती पाठवतील”, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.