शेतकरी खतांच्या किमितीनी बेजार; तर काही खत विक्रेत्यांची मनमानी
शेतकऱ्याच्या हिताचा विचार करत निसर्गाने वातावरण सुरळीत केले असे दिसत आहे. मात्र आता वातावरणाची धास्ती शेतकऱ्यांना नसली तरी वाढीव दराने खताची विक्री केली जात असल्याने शेतकरी मेटाकूटीला आला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके बहरत आहेत. शिवाय बदललेल्या वातावरणाचे सावट दूर झाले आहे. आता पिकांच्या वाढीसाठी खताचा डोस महत्वाचा राहणार आहे. तर शेतकरी विक्रेत्यांकडे मागणी करीत असताना त्याचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते. मागणी केलेल्या खताबरोबर इतर खताचीही खरेदी करण्याची अट घातली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. शिवाय काही विक्रेत्येतर जुन्या साठ्यालाच नवा दर आकारुन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.
रब्बी हंगामातील पिकांची वाढ होण्यासाठी 10:26:26 या खताची मागणी होत आहे. मात्र, याचीच टंचाई असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. शिवाय काही विक्रेत्यांकडून तर हे खत मिळेल पण त्या जोडीला अन्य खतांची खरेदी करावी लागणार असल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. खताच्या गोण्या असल्या तरी त्याची 1440 गोणी ही 1800 रुपायांना विकली जात आहे. प्रत्येक खतावर दुय्यम मिश्र खत घ्यावेच लागेल ही नवीनच अट आता विक्रेत्यांनी घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे कृषी खात्यानेच आता खताचा पुरवठा होईल यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने विभागीय कृषी कार्यालयालाच घेराव घातला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आता कुठे वातावरण निवळले आहे. त्यामुळे पिकांची वाढ जोमात व्हावी म्हणून शेतकरी खत फवारणी करु लागले आहेत. मात्र, निसर्गाच्या लहरीपणानंतर आता खत विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला सामोरे जावे लागत आहे.