Breaking: सलग एक तास खलबतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली? महत्त्वाची माहिती आली समोर*
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगावात आज सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांची मालेगावत अनेक वर्षांनी ही सभा झाली. त्यामुळे संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागलेलं होतं. या दरम्यान मुंबईत अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे या दोन बड्या नेत्यांच्या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवरुन चर्चा झाली, या विषयाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची आतली बातमी सांगितली आहे. “राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली. आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंसोबत नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली?
राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत राज्य सरकारला उद्देशून मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्याबाबतचा अल्टिमेटम दिला होता. तसेच मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केलेली. याच मुद्द्यावर आपली राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. “मशिदींवरील भोंगे याबाबत चर्चा झालीय. नियमांनुसार असेल ते केले जाईल. मनसे कार्यकर्त्यांवर ज्या केसेस टाकल्या आहेत त्या तपासून घेतल्या जातील. कोणावरही अन्याय करणार नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.