कापसाच्या टोप्या, कांद्याच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
कापसाच्या टोप्या, कांद्याच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
- कांदा आणि कापूस उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल…
- 'सरकार प्रचारात व्यस्त', 'कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त',  
- 'गद्दार सरकार जोमात...शेतकरी मात्र कोमात',
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session) आजचा दुसरा दिवस आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाला. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच डोक्यावर कापसाची टोपी, गळ्यात कांद्याच्या माळा अशी वेशभूषा करत 'शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो', 'कांद्याला भाव मिळालाच पाहिजे', 'कापसाला भाव मिळालाच पाहिजे', 'हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे', 'दोन रुपयाचा चेक देणार्या सरकारचा निषेध असो', 'शेतकऱ्यांची चेष्टा करणार्या सरकारचा निषेध असो', 'कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं' अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अमोल मिटकरींच्या डोक्यावर कांद्याचं टोपलं..
विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनोखी वेशभूषा केली. त्यांनीदेखील गळ्यात कांद्याची माळ घातली होती. तसेच डोक्यावर कांद्याचं टोपलं घेऊनच ते फिरू लागले. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव दिला नाही तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू, असा कठोर इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले. ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवला. १ रुपया उत्पन्न आहे आणि ७ ते ८ रुपयांनी कांदा बाहेर विकला जात आहे. कापसाचीही तीच स्थिती आहे. शेतकऱ्याचा कांदा सरकारने विकत घेतला पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली.