कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेतकऱ्यांवर परिणाम स्वाभिमानी संघटनेने शेतकऱ्यांसह थेट स्मशानभूमीच गाठली
बुलढाणा : गेल्या दहा ते बारा दिवसापासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावर शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी हिताचे कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही. तसेच दररोज कुठल्या ना कुठल्या विभागात संप सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे काम ठप्प पडलेले आहेत. शेतकऱ्यांचा जगून काहीही फायदा नाही. असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात अनेक शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. आज संग्रामपूर तालुक्यातील निरोड बाजार येथील स्मशानभूमीमध्ये गळफास घ्या, असे आंदोलन पुकारलेलं आहे. येत्या 12 तासात सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, तर आम्ही स्मशानभूमीतच गळफास घेत जीवन संपवत असल्याची भूमिका प्रशांत डिक्कर यांनी घेतली. यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
लोकप्रतिनिधींना लाज वाचली पाहिजे
प्रशांत डिक्कर म्हणाले, गेल्या बारा दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही. शेतकरी राज्यात आत्महत्या करत आहे. सरकार नको त्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करत आहे. या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे.
पिकविम्याचे पैसे खात्यात जमा करा
स्मशानभूमित आम्ही ४० ते ५० शेतकरी आलो आहोत. आम्ही येथील स्मशानभूमीत गळफास आंदोलन सुरू केले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा याच्या भावावर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. तसेच नुकसानभरपाईची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली पाहिजे. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले पाहिजे.
शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करा
शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करावे. दिल्ली, मुंबईतील मजुरांप्रमाणे सुविधा ग्रामीण भागातील शेतमजुरांना मिळाल्या पाहिजे. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या संदर्भात चर्चा झाली नाही. तर आम्ही गळफास घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला.
जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील १८ लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामध्ये कारागृहातील कर्मचारी देखील संपामध्ये सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्हा कारागृहाचे कामकाज देखील ठप्प झाल्याची माहिती संपात सहभगी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी आजपासून कर्मचाऱ्यानी बेमुदत संप पुकारला. पोलीस अधीक्षक कार्यालयात मंत्रालयीन कामकाज करणारे कर्मचारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही करणाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसर दणाणून सोडला होता.