घणसोलीत अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई; इतरत्र मात्र अनधिकृत बांधकामे जोमात
नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागातर्फे घणसोलीत अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली. मात्र, हि कारवाई करण्यात आली असली तरी नवी मुंबई परिसरातील इतर उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात इमले बांधले जात आहेत. कारवाई दरम्यान कोणाचीही गय केली जाणार नाही असे अतिक्रमण विभाग सांगत असला तरी शहरात काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे हि बांधकामे राजरोसपणे सुरु आहेत. शिवाय या इमारतीचा काही भाग बांधून दुकाने आणि घरे भाड्याने देण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. याकडे पालिका अतिक्रमण विभाग आणि विभाग अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेरुळ विभागात सुद्धा अशा अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय या ठिकाणी इमारत बांधून पूर्ण होत आली असून आता गोरगरीब नागरिकांना हि दुकाने आणि घरे विकण्याचा प्लॅन सुरु झाला आहे. शिवाय येथील एका इमारतीवर तुकाराम मुंढे आयुक्त असताना तोडक कारवाई करण्यात आली होती. तुकाराम मुंढे यांची बदली होताच इमारत पुन्हा बांधण्यात आली आहे. घणसोलीतील तोडक कारवाई हि तीन वर्षातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. मग नेरूळमध्ये हि कारवाई का नाही असा सवाल केला जात आहे.
गोठवली गावातील वाढत्या अनधिकृत बांधकामासंदर्भात काही लोकांनी आयुक्त, सिडको संचालक आणि नगरविकास मंत्र्यांसह मुख्यमंत्र्याना तक्रार केल्याने लवकरच नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसातच महापालिकेच्या निवडणूका लागणार आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांसह काही राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.