भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केलेला महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आज घडला, भाजपात नेमका कुणा-कुणाचा पक्ष प्रवेश?*
मुंबई: महाराष्ट्रात 14 तारखेला मोठा राजकीय भूकंप येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला. त्यांच्या या दाव्यानुसार आज भाजपात महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे पश्चिम विदर्भात आज काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वाशिमचे काँग्रेसचे माजी मंत्री आणि खासदार अनंतराव देशमुख, काँग्रेस नेते नकुल देशमुख, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार, शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांच्यासह अनेक इतर पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आगामी काळात भाजपात आणखी मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होतील, असा सूचक इशारा दिला. “अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली साडे 700 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अमृता पवार, तानुशा घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2024 मध्ये निवडणूक येईल तेव्हा अजून काही पक्षप्रवेश होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक नंबर जोडी आहे. आजचे प्रवेश तोलामोलाचे आहेत. भाजपने शिवसेनेच्या आमदार-खासदार यांना निवडून आणण्यासाठी काम केलं आज ते शिंदेंसोबत जात आहेत”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.