सोयाबीन दराचे सत्तरीच्या दिशेने पहिले पाऊल; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २५० रुपयांची वाढ
सोयाबीनचा हंगाम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना ज्या वाढीव दराची अपेक्षा होती तोच दर आता बाजारपेठेत मिळत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस बाजारसमित्या बंद होत्या त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चित्र राहणार याची उत्सुकता शिघेला पोहचली होती. मात्र, सोयाबीनच्या दर वाढीतील सातत्य कायम असून आता सात हजाराकडे सोयाबीनची वाटचाल सुरु झाली आहे. आता पर्यंत ६ हजार ५०० हा सर्वाधिक दर होता पण सोमवारी सोयाबीनला ६ हजार ७५० एवढा दर मिळाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार हे निश्चित मानले जात आहे. हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस साठवणूकीवर शेतकऱ्यांनी भर दिला होता. तोच निर्णय आता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर स्थिर झाल्यापासून आवकही वाढली होती. असे असले तरी गेल्या १५ दिवसांपासून सोयाबीन हे ६ हजार ५०० वर स्थिरावले होते. त्यामुळे यापुढे दरात वाढ होणार का घट? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. पण शेतकऱ्यांना खरा दिलासा सोयाबीनने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीमधील व्यवहार हे बंद होते. सोमावारी थेट २५० रुपायांची वाढ झाली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचा दिलासा शेतकऱ्यांना मिळत आहे.
शेतीमालाची आवक ही दरावरच अवलंबून असते. त्याच प्रमाणे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा वगळता तूर, सोयाबीन, उडदाला सरासरीप्रमाणे दर मिळत आहे. सोयाबीनचे दर स्थिरावल्यापासून आवकमध्ये वाढ होत आहे. सोमवारी लातूर बाजार समितीमध्ये १५ हजार पोत्यांची आवक झाली होती. तर दुसरीकडे हरभऱ्याची सर्वाधिक म्हणजे २२ हजार पोत्यांची आवक झाली तर खरीप हंगामातील शेवटचे पीक असणारे तूरीची आवकही वाढलेली आहे. खरीप हंगामात उत्पादनात घट झाली असली तरी सध्याच्या दरावर शेतकरी समाधानी आहे.