नाफेडकडून कांदा खरेदी बंद झाल्याने शेतकरी संतप्त, बाजारभाव कोसळल्याने मोठा फटका, सद्यस्थिती काय?
नाशिक : लाल कांदा बाजार भाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रथमच नाफेड मार्फत लाल कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली होती. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर लासलगाव येथील नाफेडच्या शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांदा खरेदी सुरु होती. ती अचानक बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी जास्तीजास्त 1141 रुपयांवर असलेले दर आज 851 रुपयांपर्यंत दर घसरले आहे. गेल्या आठवड्यातील शुक्रवार च्या तुलनेत आज जास्तीत जास्त दरात 300 रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीसह राज्य तसेच देशांतर्गतील बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक येण्यास सुरुवात झाली होती. मागणीच्या तुलनेत अधिक कांद्याची आवक झाल्यामुळे कांद्याचे बाजार भाव कोसळले आहे.
साधारण पणे कांद्याचे दर हे दोनशे ते चारशे रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नाफेड मार्फत लाल कांद्याची प्रथमच खरेदी सुरू झाली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यातील शुक्रवार पर्यंत बारा हजार मॅट्रिक टन कांद्याची खरेदी साडेतीन हजार शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र अधिवेशन संपताच सुरू असलेली लाल कांद्याची खरेदी ही बंद करण्यात आली आहे.