नवी मुंबईतील इच्छुकांना प्रारूप रचनेने धक्का; आरक्षण जाहीर होताच आणखी एका धक्क्याची शक्यता
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वीच प्रारूप रचना जाहीर झाल्याने शहरातील राजकीय गणिते बिघडण्यास सुरवात झाली आहे. प्रारूप प्रभाग रचनेने अनेक विद्यमान नगरसेवकांना धक्के बसले आहेत. शहरातील बहुतांश प्रभागांची मोडतोड झाली असून काही प्रभागात ६ हजार लोकसंख्येची तफावत दिसून येत आहे. विशेष म्हणजे यंदा कोणत्याही आरक्षणाशिवाय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्यावर मतदार याद्यांची छाननी करताना स्वतंत्रपणे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी एका मोठा धक्का इच्छुकांना बसणार असे दिसत आहे. त्यामुळे आता आक्षेप आणि हरकतीचा पाऊस पडणार हे निश्चित झाले आहे.
शहरात अनेक ठिकाणी प्रभाग एकत्र झाल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. काही परिसरातील रचनेत कमालीचा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना नव्याने राजकीय गणिते आणि जुळवाजुळव करावी लागणार आहे. नवी मुंबईत महाविकास आघाडी आणि भाजपा असा थेट सामना रंगणार आहे. प्रारूप रचनेत महाविकास आघाडीने आपल्या सोयीची रचना केल्याचा आरोप भाजप नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिवाय त्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. तर अनेक दिग्गज नेते प्रारूप रचनेवर आक्षेप घेत असल्याने निवडणुकी आधीच राजकीय आखाडा पहायला मिळणार आहे. तर जाहीर झालेल्या प्रारूप याद्यांबाबत शिवसेना वगळता सर्वच पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे.
२०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी ११ लाख २० हजार ५४७ लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी नवडणुकीत १२२ नगरसेवक असणार आहेत. त्यासाठी एकूण ४१ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात ३ उमेदवार असणार आहेत. तर शेवटच्या ४१ व्या प्रभागात २ उमेदवार असणार आहेत.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभाग रचना झाल्याने ३ सदस्यीय पद्धत लागू झाली आहे. तर वाढत्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्याही १११ वरून १२२ झाली आहे.