पचनक्रिया मंदावली आहे, वाचा बातमी आणि सुधारा पचनक्रिया
आपल्या शरीरातील अनेक समस्यांमागे (Problem) कमकुवत पचनसंस्था हे महत्वाचे कारण आहे. जर पचनसंस्थाच कमकुवत असेल तर पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला दररोज त्रास देऊ शकतात. आजकालची व्यस्त जीवनशैली, चुकीचे खाणे आणि व्यायामाचा (Exercise) अभाव याचा परिणाम पचनसंस्थेवर वाईट होतो. लोक काहीही विचार न करता खातात आणि नंतर अॅसिडिटी, अपचन (Indigestion), गॅसचा त्रास होतो. जेव्हा पचनसंस्थेवर परिणाम होतो तेव्हा चक्कर येणे, उलट्या होणे किंवा अशक्तपणा जाणवतो आणि अनेकदा थकवा येतो. त्यामुळे लोकांच्या कामावरही परिणाम होत आहे. असे काही पदार्थ आहेत ज्यांचा तुम्ही आहारात समावेश करू निरोगी राहू शकता. जाणून घ्या त्या खास पदार्थांबद्दल.
दही
उन्हाळ्यात दही खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते. यासोबतच याचे सेवन त्वचेसाठीही फायदेशीर ठरू शकते. असे म्हटले जाते की दह्यामध्ये असलेले बॅक्टेरिया पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात. दह्यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि इतर समस्या आपल्यापासून दूर राहतात. दुपारच्या जेवणात दही खाल्ल्यास ते खूप फायदेशीर ठरू शकते. आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करा.
पपई
पपई पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. यामध्ये असणारे पाचक एंझाइम पोटासाठी चांगले असतात. पपईमध्ये फायबर, कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, ई, ए आणि इतर अनेक खनिजे असतात जी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. जड आहार सहज पचण्याची क्षमता ही पपईची खासियत आहे. मात्र, कुठल्याही गोष्टीची अतिरेक अजिबात नकोच…पपईचे अतिरिक्त सेवन केल्याने पोटामध्ये गरम वाढण्याची शक्यता आहे.
सफरचंद
असे म्हटले जाते की निरोगी राहण्यासाठी दररोज एक सफरचंद खाणे आवश्यक आहे. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध सफरचंद हे पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी मानले जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सफरचंदात फायबर असते. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे रोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवरही याचा खूप उपयोग होतो.
कलिंगड
कलिंगडमध्ये भरपूर पोषक घटक असतात. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते. विशेष: उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडचा आहारात समावेश करायला हवा. कलिंगड पचनसंस्थेसाठी देखील फायदेशीर मानले जाते.