नैसर्गिक संकटामुळे शेतकरी संकटात
खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. याचा जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
२०२२-२३ या वर्षात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात होता. त्यानुसार वेळेवर पावसाने हजेरी लावली. मात्र खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर महिन्यांपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला.
खरीप हंगामादरम्यान अतिवृष्टी, पूरस्थिती आणि वादळी वाऱ्याने गोंदिया जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर रब्बी हंगामातही संततधार अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांना जेरीस आणले.
तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे यात नुकसान झाले. खरीप व रब्बी हंगामात १४,७५५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले.
भरपाईपोटी शासनाकडून ३० लाख ५९ हजार २६४ रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. रब्बी हंगामापासून शेतकऱ्यांना मोठी आशा होती, मात्र या कालावधीत अवकाळी पावसाने ४५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे १५० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.
एप्रिल महिन्यात ३२२ शेतकऱ्यांचे १२३ हेक्टर, तर मे महिन्यात ३२१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे