नव्या व्हेरिएंटचा धोका, रुग्णालये आणि कोविड सेंटरचे फायर ऑडिट करा; एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना
मुंबई: परदेशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा मोठा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार सावध झालं आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्याची गंभीर नोंद घेतली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व रुग्णालये आणि कोविड सेंटरचं फायर ऑडिट करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. हा व्हेरिएंट अत्यंत घातक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज तातडीची बैठक घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. तर, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करा. त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही शिंदे यांनी आज दिले.
राज्यातील सर्व रुग्णालये सज्ज ठेवा
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे, ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे यंत्रणा जरा निर्धास्त झालेल्या दिसतात. सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही. कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा, सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट तातडीने करुन घ्या, अशा सूचना शिंदे यांनी केल्या. सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत, रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
मास्क सक्तीचे करा
सामान्य नागरिकांकडून मास्क वापरण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. अनावश्यक गर्दीवर देखील नियंत्रण आणण्याची गरज आहे. शारीरिक अंतराची मर्यादा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या दृष्टीने सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी जनजागृती करा. प्रसंगी क्लिन अप मार्शल सारखे उपक्रम राबवून महापालिका, नगरपालिका स्तरावर मास्कची सक्ती करा, असंही त्यांनी सांगितलं.
परदेशातून आलेल्यांची यादी तयार करा
मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन द्या. कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या 10 देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व महानगरपालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घ्यावी. अति जोखमीच्या देशातून गेल्या 14 दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी विमानतळाकडून घेण्याच्याही सूचनाही त्यांनी केल्या. सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या प्रमुखांनी आपल्या अखत्यारितील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना द्या. सर्व यंत्रणांची तपासणी करुन घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
व्हेंटिलेटर सज्ज ठेवा
यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार आहे. त्यांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण करण्यात येणार नाही. दुर्दैवाने असा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार असल्याचे काकाणी सांगितले. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसे कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. व्हेन्टिलेटरची तपासणी करुन ते गरजेनुसार वापरता येईल यादृष्टीने ते सज्ज करुन ठेवण्यात येणार असल्याचेही काकाणी यांनी सांगितले. घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
परदेशातून आलेल्यांची दिवसाआड आरटीपीसीआर
नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर दर दिवसाआड करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.